नोकरी करणाऱ्यापेक्षा नोकरी देणारे बना आणि स्वाभिमानाने जीवन जगण्यासाठी उद्योजक होणे खूप महत्त्वाचे आहे. असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत पाटील यांनी केले.
उस्मानाबाद येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे रामकृष्ण परमहंस महाविद्यालय उस्मानाबाद या ठिकाणी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्पर्धा परीक्षा केंद्राच्या वतीने आरसीएफ कंपनी व ऑप्टीमल कंपनी आणि रामकृष्ण परमहंस महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या तीस दिवसीय कौशल्य विकास शिबिरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात डी.व्ही.पी समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. अभिजीत पाटील बोलत होते. ते पुढे म्हणाले की,ज्यांच्याकडे कौशल्य आहे त्याला चालू काळात महत्त्व प्राप्त होते. म्हणून विद्यार्थ्यांनी कौशल्य विकासाकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. धाडसाने घेतलेला निर्णय यशस्वी होण्यास भाग पाडतो, त्यामुळे निर्व्यसनी आणि धाडसी व्यक्ती उद्योग क्षेत्रामध्ये यशस्वी ठरते.

   कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.डी.एम. शिंदे होते. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रा. शिंदे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी नोकरीच्या संधी शोधत असतानाच उद्योग-व्यवसायाकडे देखील लक्ष दिले गेले पाहिजे. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक स्पर्धा परीक्षा विभागाचे समन्वयक डॉ.मारुती अभिमान लोंढे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. विकास भोवाळ यांनी केले, कार्यक्रमाचे आभार प्रा. माधव उगिले यांनी मानले. पाहुण्यांची ओळख कंपनीचे प्रकल्प समन्वयक प्रमोद पवार यांनी करून दिली.

हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी महाविदयालयातील प्राध्यापक व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top