उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उच्च न्यायालयाचा निकाल होऊन ३ आठवडे झाले तरीही शेतकऱ्यांच्या खात्यावर पीकविम्याची रक्कम वर्ग केली नाही. खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाने निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करत विमा देण्यासाठी कंपनीला बाध्य करण्यासाठी शेतकऱ्यांची स्वाक्षरी मोहिम सुरू केली असून हे निवेदन मुख्यमंत्र्यांना देणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले. रविवारपासून या स्वाक्षरी मोहिमेची सुरुवात पाटील यांच्या उपस्थितीत येडशी येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करण्यात आली. 

यावेळी शेतकरी रामलिंग नकाते, सूर्यकांत नलावडे, कल्याण इंगळे, दत्तात्रय नकाते यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन करण्यात आली. खरिपात जिल्ह्यात झालेले पिकाचे नुकसान उद्धव ठाकरे यांनी स्वतः बघितले होते व ‘एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदती पासून वंचित राहणार नाही’ असा शब्द दिला होता. ‘तूमची परिस्थिती बघून वाऱ्यावर सोडून देणाऱ्या पैकी मी नाही’ असे ही ते त्यावेळी म्हटले होते. परंतु संवेदनशील मुख्यमंत्र्यांचे शब्द दुर्दैवाने आजपर्यंत कृतीमध्ये उतरलेले नाहीत. खरीप २०२० हंगामात अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी उस्मानाबाद जिल्ह्यातील ३,५७,२८७ शेतकऱ्यांना ६ आठवड्याच्या आत नुकसान भरपाई देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले असून विमा कंपनीने न दिल्यास तद्नंतर राज्य शासनाने देण्याचा ऐतिहासिक निर्णय दिला आहे. मात्र, याबाबत अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने, खरीप पेरणी पूर्व शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळावी याकरिता मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवून उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे विमा कंपनीला नुकसान भरपाई देण्याचे बाध्य करण्याबाबत निवेदन देण्यात येणार आहे. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे, अ‍ॅड. रामराजे जाधव, माजी प. स. उपसभापती संजय लोखंडे, गजानन नलावडे, सरपंच गोपाळ नागटिळक, उपसरपंच राहुल पताळे, ग्रामपंचायत सदस्य अमोल अवधूत, किरण नकाते, नागेश शिंदे, उल्हास कंकाळ आदी उपस्थित होते.

 
Top