उस्मानाबाद / प्रतिनिधी-

रूपामाता नॅचरल शुगर्स युनिट क्र. 1 च्या गळीत हंगामाची सांगता करण्यात आली असून यावर्षी 1 लाख 28 मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. सर्व ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी दाखविलेला विश्वास आणि ऊस वाहतूकदार, कामगार, कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे रुपामाता शुगर्सची यशस्वी घोडदौड सुरु असल्याचे प्रतिपादन रुपामाता उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड.व्यंकटराव गुंड यांनी केले. गळीत हंगाम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहकार्य लाभलेल्या  सर्वांचे त्यांनी आभार व्यक्त केले.

 उस्मानाबाद तालुक्यातील पाडोळी येथील रूपामाता नॅचरल शुगर्स युनिट क्र. 1 च्या गळीत हंगाम सांगता समारंभात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर गुंड(गुरुजी), रूपामाता समूहाचे कार्यकारी अ‍ॅड.अजित गुंड, पाडोळी गावचे उपसरपंच बाबुराव पुजारी, हरिदास गुंड, प्रगतशील शेतकरी  शाहूराज गुंड, अ‍ॅड.शरद गुंड, संदिपान गुंड, कारखान्याचे जनरल मॅनेजर सूर्यकांत गरड, शीलवंत कृषि अधिकारी अजमेर कारभारी, सिव्हिल इंजिनिअर श्री. पठाण, विकास मंडाळे यांच्यासह पाडोळी व परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी नागरिक कामगार उपस्थित होते.

 पुढे बोलताना अ‍ॅड. गुंड म्हणाले, ऊसतोड पूर्ण झाल्यापासून दहा दिवसांत उसाचे बिल अदा करण्याचा रुपामाताने सुरू केलेला पॅटर्न पूर्ण राज्यात लोकप्रिय झाला आहे. या पॅटर्नचे शेतकर्‍यांमधून कौतुक होत आहे. याचा आपणास आनंद असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केले.

 रुपामाता नॅचरल शुगर्स क्र.1 या यशस्वी युनिट नंतर माजलगाव तालुक्यातील रोशनपुरी गावामध्ये 30 एक्कर जागेवर युनिट क्रमांक 2 ची उभारणी  पूर्ण झाली आहे. सप्टेंबर 2022 मध्ये गाळपास सुरुवात होईल. तसेच तुळजापूर तालुक्यातील देवसिंगा येथे युनिट क्रमांक 3 चे काम देखील पूर्ण झाले असून, दोन्ही कारखाने शेतकर्‍यांच्या सेवेत रुजू होत आहेत. पुढील हंगामात तिन्ही कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू होतील. तसेच कारखाना ऊस लागवड क्षेत्रात वाढ झाली असली तरी शेतकर्‍यांना निश्चितच दिलासा मिळेल. पुढील हंगामात तिन्ही कारखान्यांमध्ये गाळप, ऊस तोडणी व वाहतुकीचे नियोजन करुन कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त ऊस गाळप करणार असल्याचे अ‍ॅड.गुंड यांनी सांगितले.

 कार्यक्रमात ऊस वाहतूकदार, तोडणी मजूर, मुकादम, कारखान्याचे तांत्रिक अधिकारी, कर्मचारी  व ऊस उत्पादक शेतकर्‍यांचा सन्मान करण्यात आला. शेवटी आभार प्रदर्शन कारखान्याचे जनरल मॅनेजर सूर्यकांत गरड यांनी केले.


 
Top