उस्मानाबाद / प्रतिनिधी-

मागील वर्षापासून शासनाने ई - पीक पाहणी अॅपद्वारे पिकाच्या नोंदी घेण्याचा उपक्रम राबविला आहे. मागील वर्षी जिल्हयातील ६० टक्के शेतक-यांनी ई - पीक पाहणी अॅपवर नोंदणी करून पिकाच्या नोंदी नोंदविल्या आहेत. यावर्षी १०० टक्के नोंदणी करावी यासाठी तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक यांच्याद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. ज्या शेतक-यांकडे ॲन्ड्राईड मोबाईल नाहीत. अशा शेतक-यांसाठी प्रत्येक गावात १०-१५ शेतकरी मित्रांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यांना प्रशिक्षण देऊन अशा शेतक-यांच्या नोंदणी करून बिनचूक पीकपाहणी करण्यात येणार आहे. याचा सर्व शेतक-यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे.

  पीक पाहणीचे फायदे पुढीलप्रमाणे होणार आहेत. आतापर्यंत शेतक-यांच्या पीक पे-याची नोंद ही तलाठयामार्फत करावी लागत होती. प्रत्यक्ष गटात न जाता शेतकरी ज्या पिकांची नावे सांगेल, त्याच पीकाचा पेरा झाला, असे ग्राहय धरून त्याची नोंद होत असते. त्यामुळे नुकसान भरपाईच्या दरम्यान अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. शेतक-यांने पेरलेल्या पिकांची अचूक नोंद शासन दप्तरी व्हावी आणि शेतक-यांनाही त्याचा फायदा व्हावा, या दृष्टिने ‘ ई-पीक पाहणी’ अॅप निर्माण करण्यात आले आहे.

  या माध्यामातून शेतक-याने कोणत्या गटामध्ये कोणते पीक घेतले आहे, याची नोंद तर होणारच आहे. शिवाय ते ठिकाणही अक्षांश रेखांशमध्ये नोंद केले जाणार आहे. या अॅपमुळे शेतक-यांच्या पीक पेरणीची अचूक नोंद होणार आहे. या अॅपवरील नोंदीमुळे राज्यात एखादया पिकांचा पेरा किती झाला आहे. याची अचूक आकडेवारी एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. एका मोबाईलवर २० शेतक-यांच्या नोंदी करता येणार आहेत. प्रत्येक शेतक-याकडे मोबाईल नसतो. त्यामुळे अशा प्रकारची सुविधा देण्यात आली आहे. पेरलेले पीक आणि त्यातून होणारे उत्पन्न त्यासाठी हमीभाव केंद्र स्थापित करण्यासाठी शासनाला नियोजन करता येते. कोणत्या भागात कुठल्याप्रकारचा कच्चा माल उपलब्ध आहे. याची माहिती मिळते. पीक विम्याच्या बाबतीत अचूक माहितीचा पुरावा तयार होण्यास मदत होते. चालू आर्थिक वर्षात उसाचे प्रचंड उत्पन्न झाले आहे. परंतु उस गाळपासाठी कारखान्याची गाळप क्षमता अपुरी होत आहे. अशा अडचणीसाठी ई - पीक पहाणी ही प्रक्रिया महत्वाची आहे. त्यामुळे कुठल्याही पिकाचे अंदाजित उत्पादन विचारात घेऊन  कार्यवाही करता येते. या सर्व बाबी लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व खातेदारांनी पीक पाहणी ॲपचा वापर करावा. असेही आवाहन श्री. दिवेगावकर यांनी केले आहे.  

 
Top