उस्मानाबाद /प्रतिनिधी-

मान्सून कालावधीत विशेषत: जून आणि जुलै या महिन्यात वीज पडून जिवीत हानी होत असते. वीज पडून जिवीत हानी होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नवी दिल्ली येथील पृथ्वी मंत्रालय भारत सरकार यांनी “दामिनी” हे ॲप तयार केले आहे. हे ॲप गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) वर उपलब्ध आहे. सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी हे ॲप डाऊनलोड करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज येथे केले.

 याचबरोबर राज्यशासनाच्या सर्व कार्यालयातील तसेच तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणा, शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक, क्षेत्रीय अधिकारी, मंडळ अधिकारी, अव्वल कारकून, महसूल सहाय्यक, गाव स्तरावरील सरपंच, पोलिस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक, कोतवाल, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत डाटा एंन्ट्री ऑपरेटर यांना दामिनी हे ॲप डाऊनलोड करुन त्याचा वापर करण्याबाबत प्रवृत्त करण्यात यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री.दिवेगावकर यांनी केले आहे.

 दामिनी हे ॲप जीपीएस (GPS) लोकेशन ने काम करीत सभोवताली वीज पडत असल्यास त्या ठिकाणापासून सुर‍क्षित स्थळी जावे, झाडाचा आश्रय घेऊ नये याबाबत सर्व नागरिकांना निर्देश देण्यात यावेत. तसेच इतर सामान्य नागरिकांना हे ॲप डाऊनलोड करण्यास प्रवृत्त करावे, याबाबतच्या सूचना आपल्या स्तरावरुन निर्गमीत करण्यात याव्यात तसेच व्हिडीओ कॉन्फरन्स आयोजित करुन दामिनी ॲप हे प्ले स्टोअर वरुन डाऊनलोड करणे आणि त्याचा वापर करणे याबाबत माहिती द्यावी तसेच त्याबाबतचा अहवाल या कार्यालयास सादर करावा, अशा सूचना श्री.दिवेगावकर यांनी अधिनस्त कार्यालयातील सर्व अधिकारी-कर्मचारी यांना केल्या आहेत.

  गावातील सर्व स्थानिक शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना दामिनी हे ॲप डाऊनलोड करुन त्यामध्ये प्राप्त होणाऱ्या अलर्ट नुसार आवश्यक पूर्वसूचना गावातील सर्व नागरिकांना देऊन होणारी जीवितहानी टाळण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यास कळविण्यात यावे, असेही आवाहन श्री.दिवेगावकर यांनी केले आहे.

 
Top