उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 शेतासाठी आवश्यक असलेला, सर्व शेतकऱ्यांनी सहमती दर्शविलेला व नकाशावर अस्तित्वात असलेला शेतरस्ता रीतसर मंजूर आहे. त्या रस्त्याचे मातीकाम ९० टक्के करण्यात आले आहे. मात्र हा रस्ता पूर्ण होऊ नये यासाठी सेवानिवृत्त नायब तहसिलदार असलेल्या राठोड यांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांच्याशी संगनमत करून या रस्त्याचे काम अडविले आहे. तो रस्ता काम चालू करण्यासाठी तहसिलदारांकडे वारंवार साकडे घातले असता त्यांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत. त्यामुळे तहसिलदार यांच्यासह मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी संकटग्रस्त शेतकरी शकुंतला नंदकिशोर कदम यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे दि.१२ मे रोजी केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, उस्मानाबाद तालुक्यातील घाटंग्री शिवारात जमीन गट नं. ४०७ ही शकुंतला कदम यांची आहे. या जमिनीमध्ये जाण्यासाठी गट नं. ४०८, ४०९, ४१०, ४११, ४१२, ४१३ व ४१४ मधुन अधिकृत रस्ता आहे. हा रस्ता राठोड या शेतकऱ्याने अडविला असल्यामुळे कदम यांनी तो खुला करण्याची मागणी वारंवार तहसील कार्यालयात अर्जाद्वारे केली. त्यानंतर तहसिलदार गणेश माळी यांनी हा रस्ता खुला करुन देण्याबाबत मंडळाधिकारी यांनी आदेश दिले. त्यानुसार मंडळाधिकारी यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन रस्ता खुला करून दिला. त्याप्रमाणे जमीन गट नंबर ४०८ ते ४१३ पर्यंत काम करण्यात आले आहे. परंतू जमीन गट नंबर ४१४ मध्ये रस्त्याचे काम थोडेसे बाकी आहे. ते काम करीत असताना शेतकरी धोंडीराम हिराजी राठोड व त्यांचा मुलगा किरण राठोड यांनी ते काम अडविले आहे. धोंडीराम हिराजी राठोड हे निवृत्त नायब तहसिलदार आहेत. त्यांनी या रस्त्याचे काम मंडळाधिकारी, तलाठी यांना सांगून अडविलेले आहे. तसेच तो अर्जदार शकुंतला कदम यांना

हा रस्ता मी येथून होऊ देत नाही. त्यानंतर तहसिलदार गणेश माळी यांना दि.११ मे रोजी प्रत्यक्ष जाऊन भेटल्या. परंतू त्यांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली. कदम यांच्या जमीनीमध्ये जाण्यासाठी जमीन गट नं. ४०८ ते ४१४ च्यामधून रस्ता आहे. विशेष म्हणजे सदर रस्ता हा नकाशामध्ये दर्शविलेला आहे. तरी देखील जमीन गट नंबर ४१४ मधील शेतकरी राठोड हे हा रस्ता जाणून-बुजून अडवित आहेत. त्यामुळे गट नं. ४१४ मधून जाणारा व या शेतकऱ्याने अडवलेला रस्ता लवकरात लवकर खुला करून देण्यात यावा. तसेच तहसिलदार, मंडळाधिकारी व तलाठी हे जाणून बुजून हा रस्ता खुला करुन देत नसल्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी व लवकरात लवकर न्याय द्यावा अशी मागणी शकुंतला नंदकिशोर कदम यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.


 
Top