लोहारा/प्रतिनिधी

शेतकऱ्यांनी आपल्या शेतात आधुनिक पद्धतीच्या नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे काळाची गरज आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे येत्या खरीप हंगामात रुंद सरी वरंबा पद्धतीने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी करावी, असे आवाहन लोहारा तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग यांनी दि.१९ मे रोजी केले. 

लोहारा तालुक्यातील कास्ती (बु) येथे राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन उत्पादकता, वाढ व मूल्य साखळी विकास योजने अंतर्गत गावसभा, खरीप हंगामपूर्व प्रशिक्षणाचे कृषी विभागाच्यावतीने आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना बिडबाग म्हणाले की, शेतकऱ्यांसाठी शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी अंतर्गत ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन त्यांनी केले. तर मंडळ कृषी अधिकारी रवि बनसगोळे यांनी सोयाबीन उगवण क्षमता व बीज प्रक्रिया प्रात्यक्षिकासह सविस्तर माहिती दिली. तसेच मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड व फुलशेतीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. यावेळी रुंद सरी वरंबा पेरणीचे महत्व व त्याचा कशा पद्धतीने वापर करावा ? याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक शेतावर जाऊन करून दाखविण्यात आले. प्रास्ताविक व उपस्थितांचे आभार कृषी सहाय्यक राहुल चेंडके यांनी मानले. यावेळी कृषी सहाय्यक नागेश जट्टे, सचिन चेंडकाळे, नितीन चेंडकाळे, सागर पिचे, सरपंच अखिल तांबोळी, ग्रामपंचायत सदस्य सुधीर साबळे, परवेझ तांबोळी, भागवत चव्हाण, महिला बचत गटातील शेतकरी, ट्रॅक्टर चालक आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top