उस्मानाबाद / प्रतिनिधी-

महिलांना सर्वार्थाने सक्षम करणे ही काळाची गरज बनली आहे,त्यांना आरोग्य,शिक्षण आणि रोजगार देऊन त्यांचा शैक्षणिक तसेच आर्थिकरित्या सबलीकरण करण्यासाठी शासन सर्वोतपरी प्रयत्न करीत आहे. यामध्ये महिला बचत गटांनी सुध्दा योगदान देणे अपेक्षित आहे. महिलांवर होणारे अत्याचार आणि बालविवाह थांबवण्यासाठी बचत गटांनी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज येथे केले.

 जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेतर्फे महा ग्रामीण बचत गट कर्ज मेळाव्याप्रसंगी श्री.दिवेगावकर बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता,एम.एस.आर.एल.एम चे अप्पर सचिव धनवंत माळी आणि महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक राजेंद्र कुर्मुडा उपस्थित होते.

 कोरोनाच्या कठीन काळातून संघर्ष करून आपण पुढे आलो आहे.महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने महिलांना सक्षम आणि आर्थिकरित्या स्वयंपूर्ण बनवण्यासाठी केलेली मेहनत कौतुकास्पद आहे.यावर्षी बॅंकेला 500 बचत गटांना कर्ज वाटप करण्याचे उद्देश्य होते परंतु येथील अधिका-यांनी हा उद्देश्य जून अखेरपर्यंत 2000 बचत गटांना कर्ज देण्याचा मानस केला आहे.याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो असेही श्री.दिवेगावकर यावेळी म्हणाले. माझ्यासोबत माझ्या बहिणी आणि मैत्रिणींचेही उध्दार व्हावे, या भावनेने बचत गटातील भगीनी काम करतात.बॅंकेतून कर्ज घेतल्यानंतर 99 टक्के बचत गटांनी त्याची परत फेड केली आहे,यावरून महिलाचा स्वाभिमान आणि व्यवहारातील व्यवसायिक्तेचा अंदाज येतो. अशा बचत गटांनी आता आपली उत्पादने मोठे कर्ज घेऊन मोठ्या प्रमाणात बाजारत आणावी. आपल्या उत्पादनाची चांगली ब्रॅंडिंग करून मोठे व्यावसाय उभारावे असे आवाहनही श्री.दिवेगावकर यांनी यावेळी केले.

 बचत गटातील महिलांनी स्वत: शिक्षण घ्यावे,शिक्षाणाने जीवनात सामर्थ्य येते. आपल्या मुला मुलींना शिक्षणाची समान संधी द्यावी. बालविवाहाच्या विरोधात गावात आणि आपल्या परिसरात प्रबोधन करून मुलींना त्यांचे भवितव्य घडवण्याची संधी देण्याबाबत घरा घरात जाऊन मुलींच्या शिक्षण आणि रोजगाराबद्दल जनजगृती निर्माण करावी. महिलांनी स्वत:च्या हक्काची जमीन ठेवावी, विनाकारण जमिनीचा हक्कसोड पत्र देऊ नये. स्वत:ची जमीन असल्यास मोठे कर्ज मिळतात आणि त्यांने व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जाऊ शकतो.सुशिक्षित महिला आपल्या बचत गटाच्या व्यवसायाला चांगल्या प्रकारे हाताळतील.महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपल्या सरकारने महिला सक्षमीकरणासाठी अनेक योजना चालू केल्या आहेत परंतु या योजना योग्य रीतीने महिलांपर्यंत पोचत नाहीत. खरी गरज आहे ती या योजना महिलांपर्यंत पोचविण्याची. घरगुती हिंसाचार थांबवणे, मुलींचे शिक्षण, बाल विवाह, हुंडा प्रथा, मुलींना देण्यात येणारी घरातील वागणूक, मुला-मुलीत केलेला दूजाभाव, हे सगळे बघितले की आपण आजही कोणत्या काळात जगतो आहे हा प्रश्न पडतो. असेही श्री दिवेगावकर यावेळी म्हणाले.

 महिला शक्ती जर एकवटली, सक्षम झाली तर आपल्या भारतात अनेक सकारात्मक बदल घडवून आणू शकते. पुरुषांपेक्षा ही जास्त निर्णय क्षमता, खंबीरपणे, शांतपणे कोणत्याही समस्या सोडवण्याची ताकद या मातृशक्तीत आहे.याचसाठी महिला सक्षमीकरणाबरोबर महिला सबलीकरणही अत्यंत आवश्यक आहे . असे विचारही  श्री.दिवेगावकर यांनी यावेळी व्यक्त केले आणि बचत गटातील महिलांना भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या.

 या कर्ज मेळाव्याचे वैशिष्ट म्हणजे राज्यभरातील 7 क्षेत्रात एकाच दिवशी आयोजन करण्यात आले. मुख्य कार्यक्रम औरंगाबाद येथील मुख्यालयात आयोजित करण्यात आला आणि सर्व मेळाव्यांना ऑनलाईन प्रणालीद्वारे राज्यभर जोडण्यात आले. या मेळाव्यात महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेचे अध्यक्ष मिलिंद गारड,कार्यकारी संचालक ए.बी विजयकुमार एम.एस .आर.एल.एम चे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख एच एस वसेकर हे ऑनलाईन उपस्थित होते.

 कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात ग्रामीण बॅंकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक श्री.कुरमुडा म्हणाले की महिलांना विविध व्यवसायातून त्यांची आर्थिक परिस्थिती बळकट करण्यासाठी ग्रामीण बॅंक सतत प्रयत्नशील असते.आजच्या 608 बचत गटांना आठ कोटी  कर्ज वाटप करण्यात आले.एवढेच नव्हे तर जून 2022 अखेर 2000 महिला बचत गटांना कर्ज वाटप करण्याचा आमचा मानस आहे असेही ते यावेळी म्हणाले. या मेळाव्यात महिलांच्या सक्षमीकरण आणि सबलीकरणासाठी केल्या जात असलेल्या कर्ज वाटापाबद्दल महिला प्रतिनिधींनी आभार मानले.यावेळी मान्यवरांना बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादने भेट म्हणून देण्यात आली.तसेच ज्या महिलांनी स्टेजवर येऊन मनोगत व्यक्त केले त्यांचे विशेष स्वागत जिल्हाधिकारी आणि मानयवरांच्या हस्ते करण्यात आले.

 यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उस्मानाबाद येथील ब्रांच मॅनेजर प्रविण सोनवळकर यांनी केले तर तेर येथील ब्रांच मॅनेजर अजय रामदासी यांनी आभार मानले. या मेळाव्यास जिल्ह्यातील महिला बचत गटातील सदस्या मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

 
Top