उस्मानाबाद / प्रतिनिधी-

ऍग्री कल्चर डिप्लोमाचा पेपर देताना कॉपी पथकाने केलेली कॉपी पकडून रस्टीकेट केले. या नैराश्यातून विद्यार्थ्यांने गळफास घेवून आत्महत्या केली. ही दु:खद घटना उस्मानाबाद तालुक्यातील समुद्रवाणी शिवारात गुरुवारी (दि. २६) मध्यरात्री घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, उस्मानाबाद तालुक्यातील समुद्रवाणी येथील स्वप्निल फुलचंद ढोबळे (२१) हा उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथील ऍग्री कल्चर महाविद्यालयात डिप्लोमा करत होता. गुरुवारी (दि.२६) दुपारी तो पेपरला गेला होता. यावेळी परीक्षा केंद्रावर आलेल्या कॉपी पथकाने त्याची कॉपी पकडली व त्यास एक वर्षासाठी रस्टीकेट करण्यात आले. त्यामुळे तो या तणावात होता. रात्री समुद्रवाणी या आपल्या गावी आल्यानंतर नैराश्यातून त्याने रात्री स्वत:च्या शेतात गट नंबर ५७ मध्ये लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.

या घटना कळताच पोलिसांनी घटनास्थळास भेट देवून पाहणी केली असता त्याच्या खिशात परिक्षेचे प्रवेशपत्र आढळून आले असून अधिक तपास करण्यात येत आहे. त्याच्यावर शुक्रवारी अत्यंस्कार करण्यात आले आहेत. या तरुण विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्यामुळे त्याच्या कुटुंबावर व गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आई, एक भाऊ असा परिवार आहे.

 
Top