उमरगा  / प्रतिनिधी-

 उमरगा तालुका  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाच्यावतीने केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार विविध न्याय मागण्यांसाठी मंगळवारी (दि.१०) रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष  राजाभाऊ ओहाळ यांच्या मार्गदर्शनाखाली  तालुका अध्यक्ष प्रकाश कांबळे यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, अनुसूचित जाती, जमाती व ओबीसी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यात यावे, गायरान जमिनी कसणाऱ्या अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीय कुटूंबाच्या नांवे पाच एकर जमिनी देण्यात याव्यात, सध्या देशात व राज्यात महागाईचा भस्मासुर वाढला असून सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे त्यामुळे तात्काळ इंधन, गॅस व इतर  जीवनावश्यक वस्तु वरील महागाई कमी करावी, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे, राज्यातील दलितांवरील अन्याय, अत्याचारात वाढ झाली आहे ती तात्काळ थांबविण्यात यावी,दलित विद्यार्थ्याच्या शिष्यवृत्तीत महागाई निर्देशकांनुसार वाढ करण्यात यावी, रमाई आवास योजनेअंतर्गत सध्या अडीच लक्ष रुपये अनुदान देण्यात येते ते वाढवून पाच लक्ष रुपये करण्यात यावे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेच्या फाईलींचा तात्काळ निपटारा करावा. राज्यातील २००० पर्यंतच्या झोपडपट्टया कायम करण्यात याव्यात, राज्यातील महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाने तात्काळ कर्ज वाटप करावे, कानेगाव (ता. लोहारा) येथील बुद्ध विहाराच्या वादात अंकुश गायकवाड यांची आत्महत्या की हत्या याचा तपास करावा व दलित अत्याचार प्रतिबंध कायद्यातर्गत कलम ३०२ अंतर्गत गुन्हा नोंद करावा आदी मागण्यासाठी निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंदियाचे तालुका अध्यक्ष प्रकाश कांबळे, महिला आघाडीच्या अध्यक्षा आशाताई कांबळे, उपाध्यक्ष दगडू भोसले, गौतम सूर्यवंशी, बाबा गायकवाड,कृष्णा कांबळे, सागर मस्के, अक्षय कांबळे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.


 
Top