उमरगा  / प्रतिनिधी-

उमरगा चौरस्ता ते एकुरगावाडी या परिसरात गेल्या अनेक वर्षापासून बेकायदेशीर अवैधरित्या व विनापरवाना सुरू असलेले वीटभट्या व खडी केंद्र त्वरित बंद करण्याच्या मागणीसाठी वेळोवेळी निवेदन व स्मरणपत्र देवूनहि दखल घेतली जात नसल्याने मंगळवार(१०)पासून माडज ग्रामपंचायताचे माजी सदस्य व सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत काळे यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या समोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.

उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात खुप मोठ्या प्रमाणात नियमबाह्य स्टोन क्रशर व विटभट्टया सुरू असून ३० ते ३५ वर्षापासून तालुका परिसरातील शेतकऱ्याचे जीवनमान आधारित असणारी माती गौणखनिजाची बेकायदेशीर लूट संबंधीत अधिकाऱ्यांच्या सहकार्याने होत आहे. या सदरील परिसरातील मातीचा उपसा होत असल्याने भविष्यात येथे वाळवंट निर्माण होवून नागरिकांना व शेतकऱ्याच्या पाळीव जनावरांवरती उपासमारीची वेळ येवून जनावरे तडफडून मरतील आणि नागरिकांना आत्महत्या करण्याची वेळ येईल त्यामुळे आत्महत्येचे प्रमाणात लक्षणीय वाढ होईल. तसेच परिसरात राहणारे पशु, पक्षी, वनस्पती, मानवाचे जीवन या मातीवरच फुलते. पर्यावरणात मातीला अन खडकांना मोठे मूल्य आहे. मातीचा एक थर तयार होण्यास हजारो वर्षे लागतात. तालुका व परिसरातील वर्षाला अंदाजे हजारोहून अधिक हेक्टरवरील शेती उपयोगी मातीचा उठाव वीटभट्या मुळे होत असल्याने हजारो शेतकऱ्यांच्या येणाऱ्या भावी पिढ्या बरबाद व उध्दवस्त झाल्या आहेत.शिवाय हेवेचे अन पाण्याचे प्रदूषण मोठया प्रमाणात होत आहे. याची संबंधित कार्यालयास वीटभटया आणि खडी केंद्रामुळे होणारे अनर्थ, दुष्यपरिणामांची इत्यंभूत माहिती वेळोवेळी निवेदनाचे द्वारे दिलेली आहे. मात्र आपल्या कार्यालयाने याची गांभीर्यपूर्वक दखल, विचार आणि कार्यवाही न केल्याने कार्यालयासमोर यापूर्वी घंटानाद आंदोलन सुरू केले होते. दरम्यान चौकशी करण्याचे लेखीपत्र आणि आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले, मात्र अद्यापही दखल न घेतल्यामुळे बेमुदत आमरण उपोषणाला सुरू करत असल्याचे चंद्रकांत काळे यांनी सांगितले. यावेळी ग्रापं सदस्य गोविंदराव सूर्यवंशी उपस्थित होते.


 
Top