उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद जिल्ह्याला यापूर्वीचा भूकंप पुनर्वसन कार्याचा मोठा अनुभव पाठीशी  आहे. या पार्श्वभूमीवर कालावधीमध्ये विविध समाज घटक व वैधव्य आलेल्या महिलांच्या विकासासाठी शाश्वत विकास उद्दिष्टांवर आधारित प्रकल्प तयार करावा. एकल शेतकरी विधवा महिलांना प्राधान्याने बी- बियाणे खते उपलब्ध करून द्यावीत.  जिल्हा स्तरावर एकल महिला समिती स्थापन करून विविध शासकीय महामंडळे, माविम, उमेद, महिलांविषयक काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था यांची मदत घ्यावी.

खाजगी रुग्णालयांनी या कालावधीत जादा बिले आकारली असतील, त्यांची माहिती घेऊन नियमबाह्य बिले आकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा, असे निर्देश आज विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज येथे दिले.  विधान भवन, पुणे येथे आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये असलेल्या 102 रुग्णवाहिकाना  चालक नेमण्याबाबतच्या जिल्ह्याने दिलेल्या प्रस्तावाचा पाठपुरावा करावा, अशी विनंती जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज माननीय उपसभापती यांना केली.

डॉ. गोऱ्हे यांनी, ‘ग्रामीण भागातील विविध यात्रा उत्सवामध्ये सामान्य नागरिकांसाठी लसीकरणाची शिबिरे, कोरोना महिलांना शासकीय कागदपत्रे प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी समाधान शिबिर, छोट्या व्यावसायिकांना सहजपणे करता येतील असे व्यवसाय करण्यासाठीची मदत देण्यात यावी, अशा सूचना आज या बैठकीत जिल्हा प्रशासनाला यावेळी दिल्या. जिल्ह्यातील शिक्षकांनी उभारलेला निधी शासकीय रुग्णालयांमध्ये सामूहिक सुविधा निर्माण करण्यासाठी वापरण्याबाबत नियोजन करावे. नागरी भागात घनकचरा व्यवस्थापनाचे विविध प्रयोग शहरी भागांमध्ये प्राधान्याने करण्यात यावे. एकल महिलांना मिळणारे शासकीय अनुदान बाबतची यादी शासकीय कार्यालयांमध्ये सर्वांच्या माहितीसाठी लावण्यात यावी. त्याचबरोबर हे अनुदान या महिलांना थेट त्यांच्या खात्यात मिळावे यासाठी काम करावे. ग्रामीण भागातील शेतकरी महिलांना प्राधान्य देऊन त्यांच्या नावे त्यांच्या पतीच्या जमिनी आणि मालमत्ता हस्तांतरण करणेबाबत मार्गदर्शन शिबिरे आणि लोकअदालतीत सारखे पर्याय निवडून निवडावेत.अशा सूचना दिल्या.

माविमच्या माध्यमातून या जिल्ह्यातील एकल महिलांना मदत देण्याचे नियोजन करण्यासाठी लवकरच उस्मानाबाद जिल्ह्यात भेट द्यावी, अशी सूचना यावेळी माविमच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांना डॉ. गोऱ्हे यांनी केली. या सूचनेचा तात्काळ स्वीकार करून याबाबत कार्यवाही करण्यात येईल ,असे  डॉ गोऱ्हे यावेळी  म्हणाल्या. 

 भूकंपातील अधिक हानी झालेले लोहारा आणि उमरगा या तालुक्यांमध्ये शासकीय जमिनीवर वनीकरण यासारखे सामाजिक उपक्रम राबवावेत, या माध्यमातून यात या भागातील विकास होऊ शकेल, अशी  महत्त्वपूर्ण सूचनाही डॉ . गोऱ्हे यांनी यावेळी केली. 

यावर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी या सर्व विषयांचे अहवाल तयार करून सादर करण्यात येतील, असे सांगितले. विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून एकल महिलांना वेळोवेळी पाठपुरावा सुरू असून त्यांना वैयक्तिक पातळीवर काय मदत हवी असते याची चौकशी करण्याचा अभिनव प्रयोग सुरू केल्याची माहिती दिली. याबद्दल उपसभापती महोदयांनी त्यांचे कौतुक केले. उस्मानाबाद जिल्ह्यात लवकरच अशा अभिनव प्रयोगांबाबत एक कार्यशाळा घेण्यात येणार आहे.

 या बैठकीला उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर दूर दृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. तर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता,  उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार,पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.सुनील पसरटे, उपजिल्हाधिकारी  महेंद्रकुमार कांबळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एम. डी. तिर्थकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार आदी उपस्थित होते.

 
Top