उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना सुरू झाला असता तर जिल्ह्यात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मार्गी लागला असता. परंतु राजकारण्यांच्या हट्टामुळे कारखाना सुरू होऊ शकला नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे मोठे हाल झाले आहेत. निविदा प्रकरण पूर्ण झालेली असताना न्यायालयीन प्रक्रियेत तेरणा कारखाना  अडकवून शेतकर्‍यांचे हाल करण्यास कारणीभूत असलेल्यांचा सोमवारी (दि.9) पर्दाफाश करुन पुढील आंदोलनाची रणनीती ठरविणार असल्याची माहिती आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.अजित खोत यांनी दिली.

तेरणा साखर कारखान्याच्या प्र्रश्नावर आम आदमी पार्टी आक्रमक झाली असून या हंगामात कारखाना सुरू होणे अपेक्षित असताना केवळ राजकीय कुरघोड्या आणि आपलेच वर्चस्व राखण्याच्या नादात शेतकर्‍यांच्या चुलीत पाणी ओतण्याचे पाप  राजकारणी मंडळी करत असल्याचा आरोप आपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. खोत यांनी केला आहे. कोणत्याही परिस्थितीत कारखाना सुरू होणे गरजेचे असल्यामुळे तेरणा चालवायला घेणार्‍या व्यक्तीला सहकार्य करण्याचा निर्णय आम आदमी पार्टीने घेतलेला आहे. परंतु काही मंडळीनी या प्रयत्नाला साथ देण्याऐवजी कारखान्याचा प्रश्न न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तुळजाभवानी साखर कारखाना सुरू झाला, परंतु तेरणाचे धुराडे पेटलेच नाही. याला कारणीभूत असलेल्यांचा आपण पर्दाफाश करणार असून तेरणेच्या मार्गात आडकाठी आणणार्‍यांचे येत्या सोमवारी (दि.9) आम आदमी पार्टी पितळ उघडे पाडणार असल्याचेही अ‍ॅड.खोत यांनी म्हटले आहे. त्यामुळे आम आदमी पार्टीच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


 
Top