उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे अभद्र सरकार सत्तेत आल्यापासुन शेतकऱ्यांची व सर्व  सामान्यांची फरफट होत असुन शेतकऱ्यांच्या हक्काचा विमा देखील जुजवी कारणे सांगुन नाकारला जात आहे. मात्र शेतकऱ्यांना न्याय दिल्या शिवाय व झोपेचे सोंग घेतलेल्या या सरकारची झोप उडविल्या आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष श्री नितीन काळे यांनी भाजपा आपल्या गावी या अभियाना वेळी बोलतांना केले.

 भारतीय जनता पार्टी धाराशिव जिल्हयाच्या वतीने आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि आमदार सुजितसिंह ठाकुर यांच्या मार्गदशनाखाली तसेच भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वात गेल्या काही दिवसापासुन जिल्हाभरात भाजपा आपल्या गावी हे अभियान राबविण्यात येत आहे. भारतीय जनता पार्टी तुळजापुर तालुक्याच्या वतीने तालुक्यातील वानेगाव आणि कार्ला येथे काल या अभियाना अंतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

 यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले महसुल व कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यामध्ये 33% टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले असुन देखील खरीप २०२० चा ‍पिक विमा शेतकऱ्यांना अजुनही मिळालेला नाही. विमा कंपनीला रु ५५० कोटीचा फायदा होऊन देखील केवळ ऑनलाईन नुकसानीची सुचना प्राप्त नसल्याचे कारण देऊन विमा नाकारण्यात आला. विमा कंपनीकडुन किंवा शासनाने शेतकऱ्यांना पिकविमा द्यावा हि आमची मागणी आहे. सत्ताधारी लोकप्रतिनिधी यावर काय करत नाही. त्यामुळे आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मा.उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली असुन शेतकऱ्यांना निश्चीतच न्याय मिळेल हि अपेक्षा आहे.  या कार्यक्रमात माजी जि.प.अध्यक्षा अस्मिताताई कांबळे यांनी केंद्र सरकार राबवित असलेल्या विविध योजनांची महिती देत यापुढेही आ.राणाजगजितसिंह पाटील आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याचे आवाहन केले.

 या प्रसंगी प्रभाकर मुळे, नारायण नन्नवरे, प्रशांत लोमटे, अनिल बंडगर, बाबासाहेब श्रीमाने, कार्ला सरपंच उषाबाई किसवे, उपसरपंच तानाजी देवकर, सुभाषराव गाढवे, आप्पासाहेब पाटील, श्रीमंत देवकर, मुक्ताबाई देवकर तसेच वानेगाव आणि कार्ला ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थीत होते.


 
Top