उमरगा  / प्रतिनिधी-

 महामानवांनी आपल्या विचारांतून जातींच्या भिंती दूर करत बहुजनांना एकत्र केले. त्यांना एखाद्या जाती-धर्मात बांधून ठेवणे योग्य नाही. महामानवांच्या विचार व कार्याचे शिदोरीवरती अठरापगड बहुजन समाजाने मार्गक्रमण केल्यास वैचारिक व सामाजिक परिवर्तनाला गती येईल, असे मत संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते प्रा प्रदीप साळुंके यांनी व्यक्त केले.

शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्यावतीने जुन्या जिल्हा परिषद शाळा मैदानावर आयोजित व्याखानात रविवारी (दि २५) “महामानवाचे विचार आणि आजचे वास्तव्य” या विषयावरती प्रा साळुंके बोलत होते. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रा सुरेश बिराजदार अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रा डॉ श्रीकांत गायकवाड, प्रदेश कॉंग्रेस समिती सचिव दिलीप भालेराव,जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष कैलास शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंके उपस्थित होते. प्रारंभी तथागत गौतम बुध्द व डॉ आंबेडकरांचे प्रतिमा पूजन व दिपप्रज्ज्वलन करून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. पुढे बोलताना

प्रा साळुंके म्हणाले, की इंग्रजांना हाकलून देण्यात आपण यशस्वी ठरलो. प्रस्थापितांकडून सर्वसामान्यांचे होणारे हाल व शोषण थांबविण्यासाठी सर्वांनी कर्मकांडापासून दूर राहून परिवर्तनासाठी सज्ज राहिले पाहिजे. माणूस जोडण्यासाठी विचारांची पेरणी झाली पाहिजे. त्यासाठी ग्रंथसंपदेतून ज्ञान घेणे गरजेचे आहे. महापुरुषांना जाती-जातीत वाटून घेवून मर्यादित करू नका. महामानवांना डोक्यावर घेवून नाचण्या पेक्षा त्यांचे कार्य व विचार डोक्यात उतरावून समाज जागृती करण्यासाठी वापर करावे. डॉ बाबासाहेब यांचे संविधान हे माणस तोडणारे नाही तर जोडणारे आहे.महामानव आजही पूर्णत: कळले नसल्याने अज्ञानातून केवळ घात होत असून युवकांनी समाजाकडे जावून त्यांचे अज्ञान दुर करावे.संताचे

विचार प्रगतीचा मार्ग दाखवणारे आहेत. महिलांनी आपल्या मुला-मुलींना उत्तम संस्कार देवून घडविले पाहिजे. आपला समाज आजही विकासापासून दुर असून याचे कारण फक्त  अज्ञान आहे. लोकशाहीमध्ये महिलांनी कर्मकांडापासून दूर राहून आपल्या कुटुंबासह समाज परिवर्तनासाठी पुढे आले पाहिजे असे प्रा साळुंके यांनी सांगितले. यावेळी बोलताना डॉ गायकवाड यांनी डॉ बाबासाहेब यांनी सर्वांगीण केलेल्या कार्याची माहिती स्पष्ट केली. तसेच त्यांच्या बाबत व्यापक विचार करणे गरजेचे असून बाबासाहेब वंचित,नाहीरे वर्गाला न्याय देण्यासाठी आयुष्य खर्ची घातले आहे.त्यांचे विचार आजही तेवढेच प्रेरक ठरतात. जिल्हाध्यक्ष प्रा सुरेश बिराजदार यांनी अध्यक्षीय समारोपात सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. सुधीर कांबळे यांनी प्रास्ताविक केले. राहुल कांबळे यांनी सूत्रसंचलन केले. यासाठी जयंती समितीचे अध्यक्ष विकास कांबळे, सचिव नागनाथ कांबळे, उपाध्यक्ष दयानंद बेळंबकर, कार्याध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, सुभाषराव काळे, कोषाध्यक्ष बालाजी गायकवाड, राहुल कांबळे, रमेश जकाते, अशोक बनसोडे, बाबा मस्के, सतीश कांबळे, रत्नदीप भालेराव आदींनी पुढाकार घेतला.

 
Top