उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद  जिल्ह्यातील दारफळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भव्य व  सुसज्ज  प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. अशी प्रयोगशाळा उभरणारी ही पहिली शाळा ठरली आहे.

आर्यभट्ट नावाने ही प्रयोगशाळा उभारण्यात आली असून या प्रयोगशाळेचे उद्घाटन दारफळ चे सरपंच तथा युवासेनेचे जिल्हा समन्वयक अॅड.संजय भोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अॅड.संजय भोरे म्हणाले की, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये नैसर्गिक बुद्ध्यांक मोठ्या प्रमाणात असलेली मुले आहेत. परंतु या विद्यार्थ्यांना थेरोटिकल नॉलेज सोबत प्रॅक्टिकल नॉलेजही भेटावे या उद्देशाने ही प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांची गोडी वाढून प्राथमिक दशेतच या विद्यार्थ्यांची पायाभरणी होऊन त्यांचे भविष्य शैक्षणिक दृष्ट्या उज्ज्वल होण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन सरपंच अॅड.संजय भोरे यांनी केले. तसेच या प्रयोगशाळेत मोठा टेलिस्कोप, चार मायक्रोस्कोप यासह रसायनशास्त्र, जीवशास्त्र व भौतिकशास्त्राचे विविध प्रयोग करण्यासाठी लागणारे 103 प्रकारचे साहित्य व चार्ट उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहिती अॅड.भोरे यांनी दिली.

त्याचबरोबरीने आपले मनोगत व्यक्त करत असताना शाळेचे मुख्याध्यापक कांबळे यांनी जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांपैकी दारफळ येथे उभारण्यात आलेली ही सुसज्ज अशी प्रयोगशाळा म्हणजे जिल्ह्यातील एकमेव उपक्रम ठरणार असल्याचेही त्यांनी बोलून दाखवले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष भैरवनाथ जाधव होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामविकास अधिकारी सतीश शिंदे,समुद्रवानी बीट चे शिक्षण विस्तार अधिकारी आदटराव,केंद्र प्रमुख गिरी हे होते. तर भोसले हायस्कूल चे ज्येष्ठ शिक्षक नाना हाजगुडे, माकनिकर, भोसले, छ्त्रपती हायस्कूल चे माजी मुख्याध्यापक पांडुरंग चव्हाण यांच्यासह पोलीस पाटील सचिन जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष धर्मराज जाधव, प्रकाश घुटे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शाळेचे शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top