उस्मानाबाद / प्रतिनिधी-

सर्वसामान्यांच्या जीवनात समृद्धी आणण्यासाठी केंद्र सरकार राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी ‘भाजपा आपल्या गावी’ अभियान राबविण्यात येत असून या अभियानाची सुरुवात  आमदार राणाजगजितसिंह पाटील   यांच्या प्रमुख उपस्थितीत  गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अंबेजवळगा तालुका उस्मानाबाद येथून करण्यात आली. भाजपच्या माध्यमातून झालेला विकास व मदत कार्य तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून मोदी साहेबांनी उपलब्ध करून दिलेली कोविड प्रतिबंधक लस, मोफत धान्य, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, शेतकरी सन्मान योजना अशा विविध उपक्रमांची व खात्यावर थेट मिळणाऱ्या अनुदानाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सदरील अभियान राबविण्यात येत असल्याचे सांगत हजारो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची क्षमता असलेल्या टेकनिकल टेक्सटाईल पार्क बाबत सत्ताधारी बोलत का नाहीत ? असा प्रश्न आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी उपस्थित केला.

 यावेळी बोलताना आमदार राणाजगजितसिंह पाटील   म्हणाले की, जिल्ह्यातील विकासाबाबत राज्य सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष असून सुमारे १०००० युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची क्षमता असलेल्या टेकनिकल टेक्सटाईल पार्क बाबत राज्य सरकारकडून प्रतिसाद मिळत नाही. आमदार, खासदार, पालकमंत्री, उद्योगमंत्री यांच्यासह मुख्यमंत्री देखील शिवसेनेचे असताना अनेक वेळा मागणी करूनही याबाबत साधी बैठक का बोलावली जात नाही? सत्ताधारी लोकप्रतिनिधी याबाबत बोलायला का तयार नाहीत? असा प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला.  सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी गेल्या अडीच वर्षात उस्मानाबाद जिल्ह्यासाठी तालुक्यासाठी आणि आपल्या गावासाठी नेमकं काय केले ? ठराविक रस्ते व अनुषंगिक गुत्तेदारी च्या पलीकडे जाऊन जिल्ह्यात कुठलच भरीव काम झालेलं नाही हे कटू वास्तव आहे. आपले आमदार, खासदार पालकमंत्री सेनेचेच असताना देखील यांनी जनतेसाठी काय केले ? हे  सत्ताधाऱ्याना विचारण्याची गरज आता निर्माण झाली आहे. 

 अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या वीज तोडणी वर पहिल्या दिवसापासून भारतीय जनता पार्टीने आवाज उठवला. विरोधी पक्षाच्या आक्रमक भूमिकेमुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवली. ना. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळात शेतकऱ्यांची वीज तोडणी कधीही झाली नाही याची आठवण करून देत पीक विमा, नैसर्गिक आपत्ती ची मदत आपल्याला तातडीने मिळत होती, हे त्यांनी अधोरेखित केले. गुढीपाडव्यापासून मराठी नूतन वर्ष सुरु होत आहे. प्रभु श्रीराम रावणाचा वध करून अयोध्येत आले. त्याचप्रमाणे आपण देखील जिल्ह्यातील अपप्रवृत्ती दूर करून जिल्ह्यातील विकासासाठी प्रयनशील राहण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.

 यावेळी जेष्ठ नेते श्री. सुरेश देशमुख, प्रदेश कार्यकारिणी सदस्य दत्ताभाऊ कुलकर्णी, तालुकाध्यक्ष राजाभाऊ पाटील, जिल्हा संघटक अँड.नितीन भोसले, प्रमोद पवार, शिवाजी गायकवाड, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष अमोल जाधव, उदयकुमार थोरात, मनोज रणखांब,अनिल शिंदे, शहाजी भोसले, मोहन साबळे, संदीप शिंगाडे, राहुल शिंदे, बालाजी जाधव ,राजाभाऊ जाधव, दत्त देशमुख, विश्वास नाईकवाडी. सरपंच आनंद कुलकर्णी, माजी सरपंच राजेसाहेब देशमुख, माजी सरपंच सत्यवान चांदणे, सोसायटी चेअरमन सत्तार कोतवाल, अतुल देशमुख, हनुमंत वाघमोडे, रणजित हिप्परकर यांच्यासह बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

 
Top