उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 सर्वांना समान न्याय, समता व बंधुत्वाच्या विचारांची प्रेरणा देऊन देशाला संवैधानिक दिशा देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती साजरी करण्याचे नियोजन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने केले आहे. या अंतर्गत येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन  येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाअंतर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, मिनिट्रॅक्टर आदी योजनेच्या लाभार्थींना प्रातिनिधिक स्वरूपात लाभाचे वितरण करण्यात आले.

 या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा जात पडताळणी समिती सचिव  एस.टी. नाईकवाडी होते तर  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त, बी.जी. अरवत  उपस्थित होते.कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन श्री. अरवत आणि श्री.नाईकवाडी  यांनी केले. अरवत  यांनी अध्यक्षीय भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची सामाजिक न्यायासाठी असणारी गरज आपल्या मनोगतातून व्यक्त केली.

  या कार्यक्रमात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या लाभार्थी विद्यार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात 10  धनादेश वितरीत करण्यात आले. तसेच अनु.जातीतील स्वंयसहय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टरचा पुरवठा करणे या योजनेतील तीन  लाभार्थ्यांना मिनी ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले.  आभार  युवराज भोसले यांनी मानले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  कपील थोरात, अमोल कातंगळे,  रामभाऊ गुरव,  रमेश वाघमारे, श्रीमती. गडकर  आणि  श्रुती बनसोडे यांनी परिश्रम घेतले.

 
Top