उस्मानाबाद / प्रतिनिधी :-

समाज माध्यमांवर गाजलेल्या ‘माझ्या भीमानं सोन्यानं भरली ओटी..’ यासह अनेक बहारदार मनोरंजक आणि प्रबोधनपर गीतांनी प्रसिद्ध गायिका कडूबाई खरात यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त शाक्यसम्राट प्रतिष्ठानच्या वतीने उस्मानाबाद शहरातील कुरणे नगर येथे सोमवार, 11 एप्रिल रोजी रात्री झालेल्या या कार्यक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस कळंब-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अमित शिंदे, तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुरेश पाटील, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब वाघमारे, राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष विशाल शिंगाडे, पृथ्वीराज चिलवंत, शेखर घोडके, नरेन वाघमारे, डॉ.गवळी आदींची उपस्थिती होती. सर्व उपस्थित मान्यवरांचे प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत करण्यात आले.

यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस कळंब-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अमित शिंदे यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने दरवर्षी विविध प्रबोधनपर  कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल असे सांगतले. तर सुरेश पाटील यांनीही करणार्‍या शाक्यसम्राट प्रतिष्ठानचे कौतुक करुन यापुढेही अशा उपक्रमांना सर्वतोपरी सहकार्य करु अशी ग्वाही त्यांनी दिली.

कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध गायिका कडुबाई खरात यांनी ‘तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रं..’ या गाजलेल्या गीतांसह विविध भीमगीते व प्रबोधनपर गाणी आपल्या लयबद्ध सुरात सादर केली. प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात गाण्यांना प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आशिष लगाडे यांनी तर आभारप्रदर्शन शाक्यसम्राट प्रतिष्ठानचे अध्यक्ष आकाश वाघमारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हर्षल डावकरे, अनिकेत ओव्हाळ, प्रतिक ठवरे, चेतन मस्के, वेदांत डावरे, आकाश दणाणे, समाधान वाघमारे, मयुर बोकेफोडे, अनिकेत झेंडे आदींनी परिश्रम घेतले.   

 
Top