उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तुळजापूर तीर्थक्षेत्राचा ‘प्रशाद’ योजनेत समावेशासह जिल्ह्यातील इतर पर्यटन स्थळांच्या विकासाकरिता आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्री किसन रेड्डी यांची भेट घेतली. या वेळी तुळजापूरचा योजनेत समावेशासाठी प्रस्ताव येताच मान्यता देणार असल्याची ग्वाही मंत्री किसन रेड्डी यांनी दिली.

तुळजापूर तीर्थक्षेत्र वैश्विक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याचा मानस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला होता. तुळजापूर तीर्थक्षेत्राचा ‘प्रशाद’ योजनेमध्ये समावेश झाल्यास या भागामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढेल, रोजगार निर्मिती व आर्थिक उलाढाल वाढल्याने या भागातील व परिसरातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मोठी मदत होणार आहे. दोन राष्ट्रीय महामार्गांनी तुळजापूर तीर्थक्षेत्र जोडले गेले असून रेल्वे मार्गाचे देखील काम सुरु आहे. येथील पर्यटनाला चालना देण्यासाठी पायाभूत सुविधांची निर्मिती, पर्यटन क्षेत्राची जागरूकता वाढविणे, पर्यटन वाढविण्यासाठी क्षमता निर्माण करणे, पर्यटकांना मूल्यवर्धीत सेवा पुरवणे या बाबी आवश्यक असून यासाठी या तीर्थक्षेत्राचा ‘प्रशाद’ योजनेत समावेश करण्याची गरज आमदार पाटील यांनी व्यक्त केली. यावर प्रस्ताव प्राप्त होताच तातडीने मंजुरी देण्याचा शब्द केंद्रीय मंत्री रेड्डी यांनी दिला, अशी माहिती आमदार पाटील यांच्या वतीने देण्यात आली.

 
Top