उस्मानाबाद -प्रतिनिधी

स्टेशनरी दुकानाला लागलेल्या आगीत व्यापार्‍याचे मोठे नुकसान झाले. आग भडकली असती तर इतर दुकानेही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली असती; परंतु  नगर परिषदेचे मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दलाच्या जवानांनी सतर्कता बाळगत शर्थीचे प्रयत्न करुन वेळीच आग आटोक्यात आणल्यामुळे इतर दुकाने मात्र आगीपासून बचावली आहेत. उस्मानाबाद शहरातील तांबरी विभागात आज (दि.2) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ऐन गुढी पाडव्याच्या दिवशी ही दुर्घटना घडली.

प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार, उस्मानाबाद शहरातील तांबरी विभागात  जगदाळे यांच्या स्टेशनरी व गिफ्ट सेंटरला दुपारी अचानक आग लागली. आगीत दुकानातील स्टेशनरी साहित्य आणि विक्रीसाठी ठेवलेल्या भेटवस्तूनी पेट घेतला. उन्हाच्या कडाक्यामुळे काही वेळातच आग भडकली. काही सूज्ञ नागरिकांनी तातडीने थेट नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक हरिकल्याण येलगट्टे यांनाच फोनवर माहिती देऊन अग्निशमन दलाची गाडी तात्काळ पाठविण्याची विनंती केली. त्यावर येलगट्टे यांनी  तातडीने अग्निशमन दलाला कळवून घटनास्थळाची माहिती दिली.

अग्निशमन दलाचे पथक तात्काळ गाडी घेऊन घटनास्थळी हजर झाले. हे दुकान भरवस्तीमध्ये असल्यामुळे इतर दुकानेही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडण्याची शक्यता होती. आग लागलेल्या दुकानाचे शटर बंद असल्यामुळे आग विझविण्यात अडथळा निर्माण झाला. परंतु अग्शिमन दलाच्या कर्मचार्‍यांनी युक्ती शोधून दुकानाच्या पाठीमागील पत्रा कापून पाण्याचे फवारे दुकानात सोडून आगीवर नियंत्रण मिळविले. वेळीच आग आटोक्यात आल्यामुळे बाजूला असलेली इतर दुकाने बचावली आहेत. अग्निशमन दलाचे इन्चार्ज सुदाम खरात, फायरमन दत्ता भोजगुडे, दत्ता हराळे, सुबोध कुलकर्णी, चालक संजय कसबे, कुमार नायकल, विकास माने यांच्या पथकाने यासाठी परिश्रम घेतले.

 
Top