उमरगा / प्रतिनिधी-

 डिग्गी रस्त्यालगत खाजगी कंपनीने एअरटेल मोबाईलचे केबल टाकण्यासाठी सुरू केलेल्या कामामुळे शेकडो वृक्षांची कत्तल केली जात असल्याने वृक्षप्रेमी नागरिकांतुन संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान पर्यावरण संवर्धनासाठी कोट्यावधी वृक्ष लागवडीचा उपक्रम शासन व स्वंयसेवी संस्थाकडुन होत असताना दुसरीकडे शेकडो वृक्षाची  कत्तल होत असताना संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. 

तालुक्यातील डिग्गी ते उमरगा जाणाऱ्या अठरा किलोमीटर अंतराच्या रस्त्यालगत खाजगी कंपनीने जेसीबीच्या साहाय्याने खोद काम करण्यात येत असून रस्त्याकडेला असलेली लिंब, बाभूळ आदी प्रकारची शेकडो झाडे तोडण्यात येत आहेत  तसेच मातीचे ढिग रस्त्यालगत टाकल्याने वाहनधारकांना अडचणीचे ठरले आहे.  सद्यस्थितीत केबल टाकण्याचे बेकायदा काम कोणाच्या मर्जीने सुरू आहे अशी चर्चा नागरिक व्यक्त होत आहे. या बाबत संबंधित ठेकेदाराने सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घेतली असल्याचे सांगितले. दरम्यान गेल्या दहा वर्षापासून प्रभात मॉर्निंग ग्रूपच्या माध्यमातून डिग्गीरोड लगत हजारो झाडे जोपासना करून वाढविण्यात आली आहेत. तसेच प्रशासनाने लागवड केलेल्या झाडांचे संवर्धन करण्यात आलेले असताना केबल टाकण्यासाठी आडवी येणारी मोठे व लहान असे शेकडो  झाडे जेसीबीच्या साहाय्याने तोडण्यात आली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग व सामाजिक वनिकरण विभागाचे नियंत्रण असणे गरजेचे आहे. नियमबाह्य वृक्ष तोडीची चौकशी वरिष्ठस्तरावरून करण्याची मागणी वृक्ष प्रेमींतून नागरिकातुन होत आहे.


 
Top