माधव सूर्यवंशी
/ संवाददाता

उमरगा-लोहारा मतदारसंघाचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून शहरातील मुख्य रस्त्यावर स्ट्रीट लाईट पोल बसवणे, शहरात महत्वाचे चौकात हायमस्ट दिवे बसविण्याच्या कामांसाठी दिड कोटी रुपयाचा निधी मंजूर केले असून दहा महिन्यापूर्वी उदघाटन झाले तर चार महिने झाले स्ट्रीटलाईट पोल उभारून केबल टाकण्यात आले असताना ७० टक्के पोलवर अद्यापहि दिवे लावण्यात आले नसल्याने ठेकेदार व पालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

शहरातील राष्ट्रीय महामार्ग रस्ता दुभाजकावर बसस्थानक ते आदर्श महाविद्यालय तीन किलोमीटर अंतरावर स्ट्रीट लाईट साठी ८२ पोल उभारणे आणि शहराच्या अंतर्गत भागातील महत्वाच्या ठिकाणी ३० हायमस्ट दिवे बसवण्याचे कामाचा शुभारंभ १३ जून २०२१ ला संपन्न झाला होता. दिड कोटी रुपये मंजूर निधीतून राष्ट्रीय महामार्गाच्या रस्ता दुभाजकावर शहरातील बसस्थानक ते आदर्श महाविद्यालयाचेपर्यंत स्ट्रीट लाईट पोल आणि केबल टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. दरम्यान केबल टाकण्यासाठी साधारणतः तीन किलोमीटर अंतरावर रस्ता दुभाजकावर स्ट्रीट लाईट साठी पोल उभारले असलेल्या पोलसाठी केबल टाकताना रस्ता दुभाजक आणि रस्ता क्रॉसिंग व केबल जोडणीसाठी महामार्ग फोडून केबल टाकण्यात आले आहे. रस्ता व दुभाजक पुर्वरत काम करून देण्याची जबाबदारी संबंधीत ठेकेदाराकडे असतानाहि चार महिने झालेतरी तसेच ठेवण्यात आल्याने महामार्ग व रस्ता क्रॉसिंग करताना वाहन घसरून अपघात होण्याचा धोका असताना संबंधित विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्या चे दिसून येत आहे. संबंधित ठेकेदार, पालिका प्रशासनाने तातडीने लक्ष घालून रस्ता व दुभाजक पुर्वरत करून घ्यावे अशी मागणी नागरिक, वाहनधारकांतून होत आहे.

शहरातील ७० टक्के पोल एलईडीच्या प्रतीक्षेत

शहरात दिड कोटी रुपयातून राष्ट्रीय महामार्गावर ८२ स्ट्रीट लाईट पोल व अंतर्गत भागात ३० ठिकाणी हायमस्ट पोल उभारण्यात आले आहेत. हायमस्टचे अनेक भागात काम अपूर्ण असून स्ट्रीट लाईट पोल वरती केवळ २५ ठिकाणी एलईडी दिवे लावण्यात आली असून ५७ पोल (७० टक्के) चार महिने झाले तरी एलईडी दिव्यांच्या प्रतीक्षेत आहेत. सदरचे काम निकृष्ट झाल्यामुळे अनेक पोल झुकलेले तर एलईडी दिवे कमी व्हॅटचे असल्याने पोल जवळ उजेड तर बाकी अंधारच राहत आहे. सदरचे काम निकृष्ट, बोगस होत असलेल्या कामाला संबंधित विभाग ठेकेदाराला पाठीशी घालत तर नाही अशी चर्चा शहरवासियांतून होत आहे.

स्थानिक विकास निधीतून शहरात दिड कोटीच्या रुपयाचे काम मागील दहा महिन्यापासून सुरुवात आहे. शहरातील राष्ट्रीय महामार्गाच्या रस्ता दुभाजकावर स्ट्रीटलाईट पोल उभारून केबल टाकण्याचे काम झाले, मात्र बहुतांश पोल तकलादू असल्याने वाकले आहेत. चार महिने झालेतरी ५७  पोल एलईडी दिवे लावले नसल्याने अंधारात असून प्रकाश देणाऱ्या पोलावर दिवे कधी लावणार असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

याबाबत पालिकेचे नगर अभियंता दिनेश राऊत यांच्याशी  संपर्क साधला असता त्यांनी केबल टाकण्यासाठी घेण्यात आलेले खड्डे आणि रस्ता दुभाजक दुरुस्त करत रस्ता पुर्वरत करण्यासाठी ठेकेदाराला सांगितले जाईल. तर एलईडी दिवे शंभर टक्के बसविण्यासाठी वरिष्ठस्तरावर पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले.

 
Top