उस्मानाबाद / प्रतिनिधी-

आगामी काळात कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर अनिवार्य असून पिकांवर कीटकनाशक फवारणी, मॅपिंग, दहा बँड मल्ट्री स्पेक्ट्रम कॅमेराद्वारे पिकांचे सूक्ष्म निरीक्षण व रोगांचे पूर्वानुमान, जमिनीच्या मूलभूत घटकांचे मुल्यांकन यासाठी ड्रोनचा वापर अतिशय उपयुक्त आहे. शेती व्यवसायात मनुष्यबळाचा अभाव व मर्यादा लक्षात घेता ड्रोनचा वापर हि काळाची गरज ठरली आहे. ही बाब लक्षात घेवून जिल्ह्यात १०० ड्रोन ‘कृषी सेवा केंद्र’ सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवून आवश्यक मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय उस्मानाबाद येथे ‘तेरणा ड्रोन प्रशिक्षण केंद्राचे’ उदघाटन आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेबांच्या हस्ते आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर करण्यात आले. भविष्यात हे केंद्र आधुनिक तंत्रज्ञान वापरामध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

 तेरणा ड्रोन प्रशिक्षण केंद्रामार्फत कृषी यांत्रिकीकरण उप अभियान (SMAM) अंतर्गत “ड्रोन आधारित सेवा सुविधा केंद्र स्थापनेसाठी अर्थसहाय्य” या घटक अंतर्गत अर्ज केलेल्या पैकी २० कृषी उद्योजकांना पहिल्या टप्प्यामध्ये प्राधान्याने प्रशिक्षण देण्याचे ठरले आहे. या प्रशिक्षण केंद्रामार्फत रिमोट पायलट परवाना धारक चालक निर्माण करण्यात येतील.

केंद्र सरकार कृषी क्षेत्रामध्ये ड्रोन च्या वापराबाबत अतिशय सकारात्मक असून नुकतेच डिसेंबर, २०२१ मध्ये याबाबतचे धोरण जाहीर करून अर्थसंकल्पामध्ये यासाठी भरीव निधीची तरतूद केलेली आहे व लगेच  जानेवारी, २०२२ मध्ये केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने कृषी क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञान फायदेशीर बनवण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती.ड्रोन खरेदी करता सर्वसाधारण रु. १० लाखापर्यंत खर्च असून यासाठी प्रोत्साहन देण्याकरिता केंद्र सरकारने भरीव अनुदान जाहीर केले आहे. विविध घटकांसाठी ४०% ते १००%  अनुदान दिले जाणार आहे.

देशातील ग्रामीण भागामध्ये शेतीच्या विविध अडचणी लक्षात घेवून ड्रोनचा योग्य पद्धतीने वापर करता येवू शकतो हे आता सिद्ध झालेले आहे. ड्रोन वापराचे प्रशिक्षण देण्यासाठी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून सेन्सएकर, हैद्राबाद या कंपनीच्या सहकार्याने ‘सेंटर फॉर एक्सलन्स इन ड्रोन टेक्नॉलॉजीची’ स्थापना करण्यात आली आहे. या माध्यमातून युवकांना ड्रोन चालविण्याच्या परवान्यासह कृषी क्षेत्रात ड्रोनच्या संपूर्ण वापराचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ड्रोन तंत्रज्ञान व प्रशिक्षणाबद्दल अधिक माहितीसाठी अभियांत्रिकी महाविद्यालय, उस्मानाबाद येथे भेट द्यावी तसेच श्री. किरण आवटे (९८५०५०९९२०) यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन आ. राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी केले आहे.

या कार्यक्रमासाठी माननीय आमदार राणा जगजितसिंगजी पाटील, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री नितीन काळे, श्री राजसिंह राजे निंबाळकर, श्री ओम नाईकवाडी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे व्यवस्थापकीय समन्वयक श्री गणेश भातलवंडे, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रम सिंह माने उपस्थित होते.


 
Top