छत्रपती शिवरायांबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एका सभेत निषेधार्ह वक्तव्य केल्याने येथील गोर सेनेच्यावतीने राष्ट्रपतींना निवेदन पाठवून कोश्यारी यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला.
जिल्हाधिकार्यांना गोर सेनेच्यावतीने निषेधाचे निवेदन देण्यात आले असून त्यात म्हटले आहे की, भारत देशाच्या जडणघडणीमध्ये ज्यांचे अनन्यसाधारण महत्व आहे, अशा महाराष्ट्र राज्याचीच नव्हे तर संपूर्ण देशाची अस्मिता व प्रेरणास्त्रोत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीत त्यांचे गुरु कोण? हा वाद संपुष्टात आलेला असताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एका जाहीर कार्यक्रमात चुकीचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. राज्यपाल पदावर कोश्यारी कार्यरत असताना त्यांचे असे वक्तव्य पुरोगामी महाराष्ट्रासाठी वेदनादायी असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर तालुकाध्यक्ष कालिदास चव्हाण, तालुका सचिव मोहन राठोड यांच्यासह अन्य पदाधिकारी, सदस्यांची स्वाक्षरी आहे.