उस्मानाबाद / प्रतिनिधी
पहिल्यांदाच राज्य अर्थसंकल्पामध्ये जिल्ह्याला भरीव निधी मिळाला आहे, महाविकास आघाडी सरकारने जिल्ह्याच्या विकासाला मोठी चालना दिली असुन यामध्ये गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या प्रश्नाची सोडवणुक सरकारच्या माध्यमातुन होत आहे. कृष्णा मराठवाडा प्रकल्पाच्या कामासाठी तब्बल सातशे कोटी रुपये तर वैद्यकीय महाविद्यालयासाठी 94 कोटी रुपयाचा निधी देण्यात आला आहे.हा निधी प्रशासकीय खर्चासाठी वापरता येणार आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिल्या मुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया आ.कैलास पाटील यांनी दिली आहे. जनतेतपण आंनदाचे वातावरण पसरले आहे .
जिल्ह्यातील असेलेल्या पाझर तलावाचे रुपांतर आता साठवण तलावामध्ये करुन जिल्ह्याच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. मराठवाड्यातील विशेषत: जिल्ह्याचे प्रमुख पिक असलेल्या सोयाबीनची उत्पादकता वाढावी यासाठी देखील भरीव निधीची उपलब्धता करण्यात आली आहे.2022-23 वर्षासाठी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातुन फळबागाना प्रोत्साहन देण्यात आले यामध्ये आता केळी,द्राक्ष व ड्रॅगन फ्रुटचा समावेश करण्यात आला आहे.त्यासाठी एक लाख हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्ट ठेवण्यात आले.परभणी कृषी विद्यापीठाच्या संशोधनासाठी पन्नास कोटी रुपयाची तरतुद करण्यात आली त्याचाही चांगला परिणाम शेतकऱ्यांना होणार असल्याचे आमदार कैलास पाटील यानी म्हटले आहे.महात्मा ज्योतीबा फुले कर्जमुक्ती योजनेतंर्गत प्रोत्साहनपर अनुदानाची प्रतिक्षा शेतकऱ्यांना होती,त्याचीही पुर्तता अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली असुन शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान जाहीर करण्यात आले आहे.राज्यात सौरऊर्जा प्रकल्पातुन 577 मेगावॅट वीज निर्माण करण्यात येणार आहे,त्यामध्ये जिल्ह्याच्या कौडगाव प्रकल्पाचा समावेश केला असुन त्यालाही चालना मिळणार आहे. शेततळ्यांसाठीचे ५० हजार रुपयांचे अनुदान आता ७५ हजार रुपये करण्यात आले आहे. राज्यातील ६० हजार कृषी पंपांना वीज जोडणी दिली जाणार आहे.कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकासाला दिशा देणारा अर्थसंकल्प म्हणुन याकडे पाहता येईल असे कैलास घाडगे पाटील यानी म्हटले आहे.