महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासुन नैसर्गिक आपत्ती व कोरोनाने डोक वर काढले होते. सरकारने तशा काळातही सामान्य लोकांच्या गरजा पुर्ण करण्याचे मोठ काम केले आहे.यंदा त्यातुन काहीसा दिलासा राज्याला मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने विकासाला दिशा देणारा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. जिल्ह्याचा विचार केला तर विकासापासुन कोसोदुर गेलेल्या जिल्ह्याला पुन्हा विकासाच्या प्रक्रियेत सामावुन घेण्याचा पहिल्यांदाच एखाद्या सरकारने केल्याचा दावा खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यानी केला आहे. तसेच कृष्णा मराठवाडा प्रकल्पासाठी 700 कोटी व मेडिकल कॉलेज च्या प्रशासकीय खर्चासाठी 94 कोटींची तरतूद केल्याची प्रतिक्रिया खासदार ओमराजे यांनी दिली.
जिल्ह्याच्या सिंचनाचा प्रकल्प लवकर पुर्ण होण्यासाठी महाविकास आघाडीच्या सरकारने गेल्या तीन वर्षापासुन भरीव निधी दिला आहे. यंदा या प्रकल्पाच्या कामासाठी सातशे कोटीचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्याचबरोरीने जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाचे असणारे वैद्यकीय महाविद्यालय सूरु होण्यासाठी या सरकारनेच पुढाकार घेतला. नुसती मंजुरीच नाही तर ते शासनाच्या निधीतुन उभा करण्याचा धाडसी निर्णय सरकारने घेतला. घेतलेल्या निर्णयाशी प्रामाणिक राहुन त्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. प्रशासकीय खर्चासाठी 94 कोटी रुपये मंजुर केला आहे. या शिवाय सौर उर्जा निर्मीतीसाठी कौडगाव येथील प्रकल्पाचा देखील समावेश करण्यात आला असुन तिथेही आता विजेची निर्मीती करण्याचे धोरण शासनाने जाहीर केले आहे. राज्याच्या विविध भागासाठी परिपुर्ण ठरलेला हा अर्थसंकल्प जिल्ह्यासाठी तर वरदान ठरणार असल्याची भावना खासदार ओमराजे निंबाळकर यानी व्यक्त केली.
शेतकऱ्यांचा विचार केला तर त्यांच्यासाठी आता सिंचनाचा मोठा मार्ग मोकळा करुन दिला आहे. पाझर तलावाचे रुपांतर साठवण तलावामध्ये करण्यात आल्याने मोठा दिलासा मिळणार आहे. कर्जमाफी देताना वेळेवर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळावे अशी मागणी होती, पण कोरोनाच्या संकटामुळे ती पुर्ण झाली नव्हती. मात्र या अर्थसंकल्पामध्ये त्यालाही मंजुरी देऊन शेतकऱ्यांना आता पन्नास हजार रुपयाचे अनुदान मिळणार आहे .