उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी शहरातील चौकांमध्ये सिग्नल उभारण्यात आले खरे. मात्र काही दिवसांतच सगळ्याच चौकांमधील सिग्नल शोभेचे बांबू बनले आहेत. सिग्नल कार्यान्वित करण्यासंदर्भात वारंवार नुसतीच चर्चा होत असली तरी प्रत्यक्षात सिग्नल बंदच आहेत. त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांनी शहरातील सर्वच बंद सिग्नलच्या खांबांवर  ‘मुख्याधिकारी साहेब, मी सिग्नल आहे का नुसतंच बुजगावणं?’ असा सवाल करणारे पोस्टर लावून शहरवासियांचे लक्ष वेधले आहे. आगामी नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर शहरात हा विषय चर्चेचा ठरत आहे.

उस्मानाबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, राजमाता जिजाऊ चौक, जिल्हा न्यायालयासमोरील लहुजी वस्ताद साळवे चौक, मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसमोरील महात्मा बसवेश्वर चौक या ठिकाणी सिग्नल उभारण्यात आलेले आहेत. परंतु अनेक वर्षापासून हे सिग्नल बंदच आहेत. त्यामुळे वाहतुकीवर कसलेही नियंत्रण राहिलेले नाही. तर वाहतूक शाखेचे पोलीस देखील बायपास रोडवरील उड्डाण पुलाखाली चालकांचे लायसन तपासून दंड वसुली करतानाचे दुर्दैवी चित्र शहरात दररोजचे झालेले आहे.

तर शहरातील चौकांमध्ये अस्ताव्यस्त उभी असलेली वाहने आणि फेरीवाल्यांमुळे नेहमीच वाहतूक विस्कळीत होत असताना वाहतूक शाखेचेही दुर्लक्षच आहे. त्यातच सिग्नल बंद असल्यामुळे आणखी भर पडत आहे. त्यामुळे नगर परिषदेच्या प्रशासक पदाचा भार वाहणार्‍या मुख्याधिकार्‍यांनाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांनी सवाल करत बंद सिग्नलच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. त्यामुळे या पोस्टरची चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे.

 
Top