उस्मानाबाद / प्रतिनिधी-
जिल्हा परिषद च्या वतीने २०२२-२३ साठी विविध विकास योजनासाठी अपेक्षीत ३६ कोटी ४९ लाख ५७ हजार ५१६ रुपये अर्थसंकल्पीय वार्षीक निधीची तरतूद केली आहे. त्यापैकी २२ कोटी ९९ लाख १ रुपया खर्च अपेक्षीत असून १३ कोटी ५० लाख ५७ हजार ५१५ रुपये महसूली शिल्लकीच्या अर्थकल्पांस िद. ९ मार्च रोजी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूरी देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिताताई कांबळे व बांधकाम व अर्थ सभापती दत्तात्रय देवळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
उस्मानाबाद जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा ९ मार्च रोजी संपन्न झाली. या सभेस उपाध्यक्ष धनंजय सावंत, समाजकल्याण सभापती दिग्विजय शिंदे, कृषी व पशूसंवर्धन सभापती दत्ता साळूंके, महिला व बालकल्याण सभापती रत्नमाला टेकाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, मुख्य लेखा व वित्ता अधिकारी केंद्रे आदी उपस्थित होते. अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभेत सभापती देवळकर यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर सभागृहात जि.प. सदस्य नेताजी पाटील, धीरज पाटील, सक्षणा सलगर, प्रकाश आष्टे, महेंद्र धुरगुडे, ज्ञानेश्वर गिते, संदिप मडके, रफिक तांबोळी आदींसह इतरांनी चर्चेत सहभागी होत आपली मते मांडली. या अर्थसंकल्पात पुरेशा निधीची तरतुद न केल्याची टिका विरोधकांनी केली. तर सत्ताधारी जि.प.सदस्यांनी ग्रामीणी भागाशी नाळ असलेला अर्थसंकल्प असे म्हणत कौतुक केले.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या कक्षात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना अध्यक्षा कांबळे म्हणाल्या की, बांधकाम विभागासाठी ५ कोटी ७३ लाख ८४ हजार शिक्षण विभागासाठी २ कोटी १० लाख ६५ हजार, निवृत्ती वेतन व इतर सेवानिवृत्तीच्या फायद्यासाठी २० लाख, पाणीपुरवठा व स्वच्छतेसाठी ३ कोटी ३० लाख १ हजार, आरोग्य विभागासाठी १ कोटी २७ लाख २२ हजार ११७, अनुसूिचत जाती व जमाती दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी ४५ लाख ५६ हजार, सामाजिक सुरक्षा व दिव्यांगाच्या कल्याणासाठी ५४ लाख १ हजार, महिला व बालकल्याण विभागासाठी १ कोटी ३१ लाख २२ हजार तर कृषी विभागासाठी १ कोटी ८७ लाख ३६ हजार तसेच पशूसंवर्धन, दुग्धव्यवसाय विभागासाठी ९२ लाख ७ हजार, तर वनीकरणसाठी १ लाख व लघु पाटबंधारे विभागासाठी १ कोटी ४२ लाख व रस्ते व पुलासाठी ५१ लाख रुपये, असा २२ कोटी ९९ लाख १ रुपया खर्च अपेक्षीत आहे. तर नाविण्यपूर्ण योजनेतंर्गत स्मशानभुमी, संरक्षण भिंत, विद्यार्थी गणवेशासाठी राजमाता जिजाऊ शैक्षणीक गुणवत्ता विकास, जननी सखी योजना, विद्यार्थ्यांना सायकल वाटप, शेतकरी फार्मन्स क्लब तयार करने, फवारणीसाठी ड्रोन पुरवठा करणे, विधवा महिलांकरीता १०० टक्के अनुदानावर शेळ्यांचे गट वाटप करने, दुर्धररोग पीडितांना अर्थसहाय्य करणे आदी नाविण्यपुर्ण योजनांचा समावेश करण्यात आला आहे.