उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  तेरणा मध्यम प्रकल्पामध्ये पुरेसा पाणीसाठी उपलब्ध असून कालव्याच्या दुरुस्ती अभावी शेतीसाठी पाणी सोडता येत नाही. या कालव्यांच्या विशेष दुरुस्तीचे रु.३.४२ कोटी किमतीचे अंदाजपत्रक शासनाकडे प्राप्त असल्याचे या अनुषंगाने उपस्थित तारांकित प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट झाले असून त्यास तातडीने प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना.जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.

 दि.२४.०६.२०२१ रोजी उस्मानाबाद येथे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये तेरणा मध्यम प्रकल्पाच्या कालवा दुरुस्ती बाबत ना. जयंत पाटील साहेब यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. या अनुषंगाने कालवा दुरुस्तीचे रु. ३.४२ कोटी किंमतीचे अंदाजपत्रक ७ महिन्यानंतर दि. १५.०२.२०२२ रोजी प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाकडे प्राप्त झाले आहे. हिवाळी अधिवेशनापासुन यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु असून शेतीशी निगडीत विषयाबाबत एवढी मोठी दिरंगाई अत्यंत खेदजनक आहे.

 पाणी साठा उपलब्ध असून देखील प्रकल्पातुन बंद पाईपलाईन द्वारे थेट शेतात पाणीपुरवठा करण्याचा पथदर्शी प्रकल्प काही तांत्रिक दोष आढळल्यामुळे बंद आहे, व अनेक वर्षे देखभाल दुरुस्ती न झाल्याने कालव्याद्वारे शेतीसाठी पाणी सोडता येत नाही. प्रकल्पावरील डाव्या व उजव्या कालव्याची एकूण लांबी ३२ कि.मी. असून याद्वारे तेर, रामवाडी, डकवाडी, इर्ला, दाऊतपूर, कोळेवाडी व भंडारवाडी या गावांतील १६६५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते.

त्यामुळे तेरणा मध्यम प्रकल्पा वरील कालव्याच्या विशेष दुरुस्तीसाठी रु. ३.४२ कोटी किंमतीच्या अंदाजपत्रकाला मान्यता देवून तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी आ. राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.

 
Top