महाविकास आघाडीत फुट, शिवसेना एकाकी 


उस्मानाबाद / प्रतिनिधी

उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत फुट पडल्याचे दिसून आले. त्यामुळे अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे बापुराव पाटील अध्यक्ष तर राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर मोटे उपाध्यक्ष यांचे ११ विरूध्द ४ मताने निवड झाली. या निवडणुकीत शिवसेना एकाकी पडली असतानाही शिवसेनेचे एक मत फुटल्याचे पहावयास मिळाले. 

उस्मानाबाद डीसीसी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणुक महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांनी एकत्र लढवली होती. १५ संचालक असलेल्या या बँकेच्या निवडणुकीत महाआघाडीतील तीनही पक्षांनी पाच-पाच जागा वाटून घेतल्या होत्या. या निवडणुकीत भाजपाचा सफाया करून महाविकास आघाडीतील तीन ही पक्षांनी प्रत्येकी पाच जागेवर विजय मिळवला होता. एकसंघ असलेल्या महाआघाडीत अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडीवरून बिघाडी झाली होती. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीत एकत्र आले. तर शिवसेना एकाकी पडली.  त्यामुळे आखेर निवडणुक घेण्यात आली. सोमवार दि. ७ मार्च रोजी जिल्हा उपनिंबधक सुनिल शिरपूरकर यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची निवडणुक घेण्यात आली. अध्यक्ष पदासाठी काँग्रेसकडून बापूराव पाटील तर शिवसेनेकडून संजय देशमुख व उपाध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मधुकर मोटे तर शिवसेनेकडून बळवंत तांबारे यांनी उमेदवारी अर्ज भरले. उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या कालावधीनंतर अर्ज परत न घेतल्यामुळे गुप्त पध्दतीने मतदान घेण्यात आले. यावेळी अध्यक्षपदासाठी बापूराव पाटील व उपाध्यक्ष पदासाठी मधुकर मोटे यांना प्रत्येकी  ११  मते मिळाली तर संजय देशमुख व बळवंत तांबारे यांना ४ मते मिळाली. विशेष म्हणजे शिवसेनेचे पाच संचालक असताना एक फुटल्यामुळे शिवसेना धक्का मानला जाता आहे. 

पवारांचा दौरा टर्नींग पॉईन्ट ठरल्याची चर्चा 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा रविवार दि. ६ मार्च रोजी उस्मानाबाद तालुक्यात दौरा झाला होता व दुसऱ्या दिवशी म्हणजे ७ मार्च रोजी उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या निवडणूका होणार होत्या. त्यामुळे पवार यांचा दौरा टर्नींग पॉईन्ट असल्याची चर्चा निवडीच्या वेळेस होती.गेली पाच वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या जिल्हा बँकेला प्रगतीपथावर घेऊन जाता आले नाही. व राज्य सरकारने कोणतेही सरकार्य केले नाही, असे असताना जिल्हा बँकेवर परत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली आहे. तर जिल्हयात राजकीय वर्चस्व १ खासदार, ३ आमदार असलेल्या  शिवसेनेला  बाजूला बसविण्यात आले आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत शिवसेनेचे एमत मत फुटल्यामुळे गटबाजी परत एकदा समोर आली आहे. 

ही लोकशाही प्रक्रिया-बापूराव पाटील 

महाविकास आघाडी म्हणून आपण संचालक मंडळाची निवडणुक लढविली आहे, असे असताना अध्यक्ष्र-उपाध्यक्ष निवडणुकीत फुट पडली का ? याबाबत विचारले असता बापूराव पाटील यांनी महाविकास आघाडीत फुट पडली नसून ही लोकशाही प्रक्रिया आहे, असे सांगत वेळ मारून नेहली. काँग्रेसचे दुसरे संचालक सुनील चव्हाण यांना आपण अध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याची चर्चा होती. आपण नाराज आहात का ? असे विचारले असता चव्हाण यांनी बापूराव पाटील यांचे नाव आपणच सुचविले असल्याचे सांगून आपण नाराज नसल्याचे सांगितले. 


 
Top