उस्मानाबाद / प्रतिनिधी-

महाराष्ट्रात विषमुक्त, सेंद्रीय शेतीची चळवळ गावागावात पोहचविण्यासाठी महा ऑरगॅनिक रेथ्यूड्यू फ्री फार्मर्स असोसिएशन (मोर्फा)ने पुढाकार घेतला असून जास्तीत जास्त शेतकर्‍यांना यात सहभागी करुन घेण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यात जनजागृती करणार असल्याची माहिती मोर्फाच्या जिल्हाध्यक्षा सौ.सुरेखा जाधव यांनी दिली.

बारामती तालुक्यातील कन्हेरी-काटेवाडी येथे माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील मोर्फाचे जिल्हाध्यक्ष व संचालकांची बैठक  पार पडली. या बैठकीत सेंद्रीय शेतीची चळवळ गतिमान करुन सेंद्रीय उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याकरिता उपाययोजनांबाबत खा. शरद पवार यांनी मार्गदर्शन केले.  सेंद्रीय शेतीकडे जास्तीत जास्त शेतकरी वळावेत यासाठी मोर्फाच्या पदाधिकार्‍यांनी जनजागृती करावी, असे आवाहन करताना प्रत्येक शेतकर्‍याने किमान दहा गुंठे तरी सेंद्रीय शेती करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन खा. पवार यांनी केले.  

तसेच प्रत्येक शहराच्या ठिकाणी तीन दिवस सेंद्रीय पद्धतीने पिकविलेल्या भाजीपाला, फळे व इतर पिके विक्रीसाठी बाजार भरविण्यात यावा, शेतकर्‍यांनी उत्पादित केलेल्या सेंद्रीय पिकांची मोर्फामार्फत खरेदी करुन बाजारपेठ मिळवून द्यावी, तुम्ही पिकवा - आम्ही खरेदी करु असा विश्वास शेतकर्‍यांमध्ये मोर्फाने निर्माण करावा. त्याचबरोबर गावागावात वाहनाद्वारे सेंद्रीय उत्पादनाची विक्री करुन त्यासोबत जनजागृती देखील करावी, असे आवाहन देखील खा. पवार यांनी केल्याची माहिती मोर्फाच्या जिल्हाध्यक्षा सौ.जाधव यांनी दिली. बैठकीस सेंद्रीय शेती चळवळीचे  प्रमुख युगेंद्र पवार, अध्यक्ष अंकुश पाडुळे, उपाध्यक्षा स्वातीताई शिंगाडे, सचिव प्रल्हाद वरे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर उस्मानाबाद येथून जिल्हाध्यक्षा सौ.सुरेखा जाधव या बैठकीस उपस्थित होत्या.


 
Top