उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राष्ट्रवादी काँग्रेसमधील महिला पदाधिकार्‍यांमध्ये निर्माण झालेली संभ्रमावस्था दूर करत दस्तुरखुद्द राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी निष्ठावंतांना पक्षात कदापि डावलले जाणार नाही, अशी ग्वाही दिल्यानंतर  महिला आघाडीमध्ये जोशपूर्ण वातावरण निर्माण झाले असून शहरात ठिकठिकाणी झकळत असलेल्या डिजिटल फ्लेक्सची जिल्हाभरात चर्चा रंगली आहे. एकुणच निष्ठावंत महिला कार्यकर्त्यांमध्ये न्याय पक्षश्रेष्ठींकडून मिळाल्याची भावना असून आगामी काळात मोठ्या जोमाने पक्षसंघटन मजबूत करुन महिला कार्यकर्त्यांची भक्कम फळी जिल्ह्यात निर्माण करणार असल्याचे महिला बोलून दाखवत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये निष्ठावंत महिला कार्यकर्त्यांची कुचंबना होत असल्याने सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा जिल्ह्यातील अनेक महिला पदाधिकार्‍यांनी दिला होता. तसेच शनिवारी महिला पदाधिकार्‍यांच्या शिष्टमंडळाने बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांची भेट घेऊन जिल्ह्यातील परिस्थिती कथन करत निष्ठावंतांना कशा पद्धतीने डावलले जात असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. तेव्हा दस्तुरखुद्द खासदार शरद पवार आणि संसदरत्न, खासदार सुप्रिया सुळे यांनीही महिला पदाधिकार्‍यांना पूर्ववत पक्षात कार्यरत राहण्याचे सांगून यापुढे निष्ठावंतांवर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही दिली होती.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या भेटीनंतर उस्मानाबाद शहरात महिला आघाडीच्या पदाधिकार्‍यांचे जागोजागी डिजिटल फ्लेक्स झळकू लागले असून यशाच्या प्रदर्शनामध्ये एक प्रतिमा संघर्षाची ही.....  जिंकायला धाडस लागतं तर हरायला ताकद... अशा अर्थपूर्ण ओळी त्यावर आहेत. त्यामुळे महिला आघाडी जिल्ह्यात मोठ्या जोमाने कामाला लागल्याचे दिसत आहे.


 
Top