उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 मागील एक ते दीड महिन्यापासून कळंब उस्मानाबाद तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे ऊस जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. हे नुकसान न भरून येणारे आहे. या सोबतच शेतकऱ्यांना आणखी एका दुसऱ्या आसमानी संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे ही शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन महाराष्ट्राचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी ई-मेल द्वारे पत्र पाठवत शेतकऱ्यांना ठिबक व तुषार सिंचनाची जी जाचक अट आहे ती अट रद्द करावी अशी मागणी केली आहे.

 शेतकऱ्याला तुषार सिंचन किंवा ठिबक सिंचन योजना घेतल्यानंतर पुन्हा ती सात वर्ष घेता येत नाही हा शासकीय नियम आहे. यामध्ये बदल करून जे ऊस जळीत शेतकरी आहेत व ज्यांचे ठिबक सिंचन जळून यामध्ये खाक झाले आहे. अशा लोकांना या नियमाचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्राचे  कृषी मंत्री दादाजी भुसे यांना हे पत्र पाठवत हा नियम बदलून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पुन्हा ठिबक सिंचन व तुषार सिंचन अनुदान मिळावे अशी मागणी केली आहे.

या मागणीच्या प्रती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवारसाहेब,व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनाही देण्यात आल्या आहेत.


 
Top