उस्मानाबाद (प्रतिनिधी) - 

आपला भारत देश इंग्रज येण्यापूर्वी पोर्तुगीज, डच अशा वेगवेगळ्या ५६५ संस्थानिकांच्या विळख्यात व गुलामगिरीत अडकलेला होता. तर गोवा मुक्तिसंग्राम, हैदराबाद मुक्तिसंग्राम, ब्रिटिश व पोर्तुगाल यांच्याविरुद्ध लढा देणाऱ्या देशातील सर्व स्वातंत्र्य सैनिकांचा मेळावा उस्मानाबाद येथे दि.२६ मार्च रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती या मेळाव्याचे संयोजक तथा स्वातंत्र्य सैनिक वारसदार बुबासाहेब जाधव यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दि.२१ मार्च रोजी दिली.

येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य स्वातंत्र्य सैनिक उच्चाधिकार समितीचे सदस्य तथा मेळाव्याचे स्वागताध्यक्ष विष्णुपंत धाबेकर, स्वातंत्र्यसैनिक भास्करराव नायगावकर आदी उपस्थित होते. पुढे बोलताना जाधव म्हणाले की, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव केंद्र सरकार मोठ्या थाटामध्ये साजरा करीत असून ही आनंदाची बाब आहे. ‌ मात्र ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःचे बलिदान दिले. अशा स्वातंत्र्य सैनिकांना किंवा त्यांच्या वारस पत्नी किंवा मुलांच्या समस्या व अडचणी जाणून घेण्याचा साधा प्रयत्न देखील केला जात नाही. ‌याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व खंत व्यक्त केली. तसेच आपण सर्वजण वर्तमानात जगत आहोत. परंतू भूतकाळ विसरलो आहोत. भूतकाळ विसरल्यामुळे भारताला भविष्य नाही असे सांगून ते म्हणाले की, तरुण व भावी पिढीला देशाचा इतिहास काय होता ? याची माहिती व्हावी.  या एकमेव उद्देशानेच चिलवडी येथील स्वातंत्र्य सैनिकांनी देशभरातील सर्व स्वातंत्र्य सैनिकांना एकत्र आणून त्यांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक व्हावी व स्वातंत्र्याचा खरा इतिहास सर्वांना माहीत व्हावा यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या मेळाव्यात स्वातंत्र्य सैनिक, त्यांच्या वारस पत्नी व मुलांच्या विविध प्रश्नांवर उहापोह करण्यात येणार आहे. या मेळाव्या दरम्यान, स्वातंत्र्य लढ्यातील विविध पुस्तकांचे प्रदर्शन ठेवण्यात येणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


 
Top