तुळजापूर/प्रतिनिधी
श्रीनगर (जम्मू आणि काश्मीर) येथे २४ ते २८ मार्च दरम्यान पार पडलेल्या राष्ट्रीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने दोन कांस्य पदक पटकावत दमदार पुनरागमन केले. मागील दहा वर्षापासून आजपर्यंत महाराष्ट्राच्या खात्यात सांघिक खेळात एकाही पदकाची कमाई झाली नव्हती. यंदाच्या यशामुळे पदकांचा दुष्काळ संपवत महाराष्ट्र राज्य सॉफ्ट टेनिस संघ सांघिक खेळासह मुलींच्या दुहेरी स्पर्धेत दोन कांस्यपदक प्राप्त करण्यात यशस्वी ठरला.
श्रीनगर येथे सॉफ्ट टेनिस फेडरेशन अॉफ इंडिया आणि जम्मू अँड काश्मिर सॉफ्ट टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पंधरावी सबज्युनियर राष्ट्रीय सॉफ्ट टेनिस स्पर्धा २०२१ - २२ आयोजित करण्यात आली हेती.दि. २४ ते २८ मार्च दरम्यान मल्टी स्पोर्ट्स अॅक्टिव्हिटी सेंटर, गिंडन स्टेडियम, राजबाग श्रीनगर येथे या स्पर्धा संपन्न झाल्या.
या स्पर्धेत महाराष्ट्र राज्य संघाने घवघवीत यश प्राप्त केले. मुलींच्या दुहेरी स्पर्धेत प्रियांका हंगरगेकर आणि स्वरांजली नरळे यांनी कांस्यपदक प्राप्त केले. तसेच मुलींच्या संघाने सांघिक स्पर्धेत कांस्यपदक प्राप्त केले. या संघात प्रियांका हंगरगेकर तुळजापूर, स्वरांजली नरळे सोलापूर, अयाती दंदाडे पुणे, विनिता खेदर, पलक परदेशी, देवश्री जगताप सर्व बुलडाणा, शौर्या पाटील सांगली यांचा समावेश होता.
या संघाला प्रशिक्षक शिवाजी व्हसपटे, संघ व्यवस्थापक पल्लवी कदम, तसेच भारतीय अॉलिंपिक संघटनेचे सहसचिव नामदेव शिरगावकर, म.रा. सॉफ्ट टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष सुनिल पूर्णपात्रे, सहसचिव रविंद्र सोनवणे, विजय पळसकर तुळजापूर येथील प्रशिक्षक संजय नागरे, हेमंत कांबळे, राहुल जाधव यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.