उस्मानाबाद / प्रतिनिधी-
अस्मानी व सुलतानी अशा दोनही संकटामुळे वर्षानुवर्षे कायम मागास राहिलेल्या मराठवाड्याचा शाश्वत कृषी विकास करायचा असेल तर या क्षेत्रात कार्य करणाऱ्या सामाजिक संस्था,संघटना, व्यक्ती या सर्वानी एकत्र येऊन दिशा ठरविण्याची व सामूहिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत भारतीय किसान संघ महाराष्ट्र प्रदेश संगठन मंत्री चंदनजी पाटील यांनी व्यक्त केले
ते भारतीय किसान संघ महाराष्ट्र प्रदेश यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या शाश्वत कृषी विकास योजने अंतर्गत धाराशिव जिल्हा विकास घटक बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते.
या योजनेची धाराशिव जिल्हा समन्वय संस्था म्हणून राष्ट्रीय सर्वांगीण ग्रामविकास संस्थेकडे जबाबदारी असल्याने बैठकीचे संपूर्ण नियोजन RSGS कडे होते. उस्मानाबाद येथील व्यंकटेश महाजन महाविद्यालय सभागृहात संपन्न झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील आठही तालुक्यातून 54 संस्थाचे 104 प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी भारतीय किसान संघ महाराष्ट्र संघटन मंत्री चंदनजी पाटील ,समन्वयक शशिकांत गव्हाणे यांनी मार्गदर्शन केले. तसेच बैठकीसाठी किसान संघ महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रावसाहेब शहाणे , जिल्हा संयोजक रावसाहेब कुलकर्णी, म. फुले ग्रामविकास प्रतिष्ठान कार्यवाह बापू रावगावकर, जिल्हा कार्यवाह बाकलीकर,एस एससपी संस्थेचे समन्वयक किरण माने, अंशकालीन कार्यकर्ते धनाजी धोतरकर, ओमप्रकाश घाटे उपस्थित होते. बैठकीचे नियोजन श्री बुकन व बाळकृष्ण बडवे यांनी केले.