महाराष्ट्र सरकारने राज्यातील तीनशे आमदारांना दुसरा घरोबा थाटता येण्यासाठी मुंबईत घरे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे आता राज्यातील गोरगरीब जनतेच्या करातून या सर्व आमदारांना नवीन ग्रहप्रवेश करतेवेळी भांडीकुंडी देण्याची व्यवस्थाही करण्याची मागणी जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते अँड रेवण भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
प्रारंभी झालेल्या टीकेमुळे मोफत नव्हे तर 75 लाखला ही घरे देण्यात येणार आहेत, खरेतर या किमतीत मुंबईच्या टोकाला वन रूम किचनचे घर फार तर मिळू शकते परंतु आपल्या सरकारने आमदारांना परवडणाऱ्या किमतीत ही घरे देण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते. मुंबईत परवडणाऱ्या किमतीत घरे घेऊ इच्छिणाऱ्या रहिवाशांची संख्या जवळपास दहा लाख आहे ,त्यांना निवारा हवा आहे पण बिल्डरकडून सांगण्यात येणारे दर त्यांना परवडत नाहीत म्हणून ते भाड्याच्या घरात वा छोट्या खूराड्या मध्ये राहत आहेत .ज्येष्ठ समाजवादी नेत्या मृणाल गोरे आणि बाबुराव सामंत यांच्या नेतृत्वाखाली परवडणाऱ्या किमतीतील घरासाठी दुसरे आंदोलन सुरू झाले, त्यावेळीही सव्वा लाख लोकांनी प्रत्येकी दहा हजार रुपये भरून महाराष्ट्र सरकारकडे अर्ज केले होते, पण महा आघाडी सरकारचा घटक असलेल्या काँग्रेस पक्षाच्या विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सरकारने यूएलसी कायदाच रद्द करून मुंबईकरांच्या आशेवर पाणी फिरवले. त्यानंतरही या कायद्यांतर्गत राज्य सरकारला मिळालेल्या एक हजार एकर जमिनीवर पाणी सोडण्याचे काम आपल्या पक्षाच्या सरकारने केले आहे. या मुंबई शहरात अनधिकृत झोपड्या बांधणाऱ्यांना घर मिळू शकते, सरकार ,महापालिका ,रेल्वे या मधले बाबू स्वतःसाठी घर मिळवू शकतात ,सरकारी कर्मचारी त्यांना राहण्यासाठी भाड्याने दिलेल्या घरावर कायमचा हक्क सांगू शकतात पण सामान्य मुंबईकरांना हक्काचा निवारा मिळू शकत नाही. त्यांना मोफत काही नको असून गोरेगावच्या नागरी निवारा सारख्या प्रकल्पाच्या माध्यमातून परवडणाऱ्या किमतीत घर हवे आहे पण त्यासाठी काही करण्याची आपण आपल्या सरकारची तयारी दिसत नाही .मात्र या 300 बेघर आमदारांच्या निमित्ताने मुंबईत परवडणाऱ्या किमतीत घरे उपलब्ध नाहीत .अगदी कोट्याधीश आमदारांनाही मुंबईतील घर परवडणारे नाहीत हे आपल्या लक्षात आले असावे असी जनता दलाची धारणा आहे तसेच राज्यकर्त्यांना मुंबईविषयी मुळीच प्रेम नसून या शहराकडे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी म्हणून ते पाहतात असा समज आहे. त्यामुळे तीनशे आमदारांना मुंबईकरांचे प्रश्न समजावेत म्हणून त्यांना थेट मुंबईकर करून त्यांच्या मनात मुंबईविषयी प्रेम निर्माण करण्याचा आणि त्यांच्या मदतीने मुंबईकरांचे प्रश्न सोडविण्याचा उदात्त हेतू जनता दलाला दिसत आहे. या एकूणच पार्श्वभूमीवर राज्यभरातील आमदारांना परवडणाऱ्या किमतीत घर देण्याच्या निर्णयाचे सामान्य मुंबईकरांच्या वतीने जनता दल स्वागत करतो .नवीन वास्तु घेतल्यानंतर संबंधित कुटुंबाला काही भेट देण्याची आपली प्रथा व परंपरा आहे त्यामुळे मुंबईकर होणाऱ्या आमदारांना गृहप्रवेशाच्या वेळी निवाऱ्याच्या प्रतिक्षेत असलेल्या आमदारांना गोरगरीब व सामान्य जनतेच्या करातून भांड्याकुंड्याची व्यवस्था करण्याची तसेच मातोश्री हे वडिलोपार्जित निवास्थान आहे हे सर्वश्रुत आहे पण चिरंजीव आदित्य यांचे निवासस्थान असण्याची शक्यता नाही, त्यामुळे या तीनशे जणांच्या यादीत त्यांचे नाव समाविष्ट करण्याची मागणी ॲड भोसले यांनी केली आहे.