उस्मानाबाद / प्रतिनिधी-

येथील जिल्हाधिकारी कार्यालय आणि महाराष्ट्र पर्यटन संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने २७ आणि २८ मार्च, २०२२ रोजी पर्यटन महोत्सव तेर- २०२२ साजरा करण्यात येणार आहे.त्यानुषंगाने दि. २७ मार्च, २०२२ रोजी सकाळी ८:३० ते १०:३० पर्यंत हेरिटेज वॉकचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच सकाळी ११:०० ते १:०० या वेळेत तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालय येथे श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित तसेच संत गोरोबा काका आणि ऐतिहासिक नगरी (तगर) या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.

दि.२८ मार्च, २०२२ रोजी सायंकाळी ६:०० वा. संत गोरोबा काका मंदिरासमोर सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते तर आमदार कैलास पाटील आणि जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. ऐतिहासिक नगरी (तगर) या विषयावर तेर येथील दीपक महाराज यांच्या प्रस्तावनेने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे.

त्यानंतर वैराग्य महामेरु शिक्षण संस्था सोलो वादन,मृदंग वादन, स्वर लहरी, मराठी चित्रपटांच्या गाण्यांच्या सुरेल नजराना तसेच जिल्ह्याचे भूमिपुत्र श्रीकांत शिंदे आणि समाधान निचळ यांच्या सुगम संगीत आणि भावगिताद्वारे कार्यक्रमाची सांगता होणार आहे.   जिल्ह्यातील सर्व प्रेक्षकांना आणि भाविकांना या सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालय आणि महाराष्ट्र पर्यटन संचालनालयातर्फे करण्यात आले आहे.

 

 
Top