उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शहरातील वैराग रस्त्यालगत असलेल्या चमार लेणीची इतिहास व पुरातत्व परिषदेच्या वतीने स्वच्छता करण्यात आली. लेणीजवळ वाढलेली झाडी व कचरा काढण्यात आला.

प्राचीन वारसा सांगणाऱ्या या लेणीत घाणीचे साम्राज्य व खूप मोठी झाडी तयार झाली होती. काही लोक इथे मेलेली जनावरे, जनावरांचे अवशेष टाकण्यात येत असतात. तसेच काहींनी तर कचरा टाकण्याचे ठिकाणच याला बनवले आहे. यामुळे लेणीच्या परिसराला अवकळा आली होती. कोट्यवधी रुपये खर्चूनसुद्धा अशा वास्तू आपल्याला उभा करता येणार नाहीत, याची जाणीव असलेल्या इतिहास व पुरातत्व परिषदेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी येथे स्वच्छता माेहिम राबवली. कुऱ्हाड, टोपले, झाडू, खराटे घेऊन कार्यकर्ते येथे सकाळीच जमा झाले होते. यावेळी सर्वांनीच श्रमदान करून स्वच्छता केली. स्वच्छता मोहिमेत परिषदेचे अध्यक्ष जयराज खोचरे, व्यंकट कोळी, प्रवीण माळी, अमोल शिरसाट, रणजित बरडे, गणेश खोसे, पृथ्वीराज खोसे, लक्ष्मण पाचकुडवे , पांडुरंग शिंदे आदींनी भाग घेतला.


 
Top