उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील २०२० व २९२१ मध्ये अतिवष्टी होऊन शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीपोटी शासनाने जाहीर केलेल्या अनुदानाची ७५ टक्के रक्कम शेतकऱ्यांना दिली. मात्र उर्वरित २५ टक्के रक्कम अद्यापपर्यंत देण्यात आलेली नाही. तर पीक विमा कंपनीने विविध अटींचा बागुलबुवा उभा करून पीक विमा देण्यास एक प्रकारे नकार दिला आहे. त्यामुळे शेतकरी कृत्रिम संकटाच्या कात्रीत सापल्यामुळे विमा कंपनीने नुकसान भरपाईची रक्कम देण्यात यावी, यासह इतर मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि. १५ फेब्रुवारीपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. आज िद. १६ फेबुृवारी रोजी आंदोलनाचा दुसरा दिवस होता. 

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, जिल्ह्यात गतवर्षी अतिवृष्टी होऊन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य शासनाच्या घोषणेनुसार अद्यापही हेक्टरी १० हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या बँकखात्यावर जमा झालेली नाही. सन २०२० २१ चा खरीप व रब्बी पीक विमा तर सन २०२१-२२ चा खरीप पीक विमा नुकसानीच्या प्रमाणात शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आला नाही. शासनाने तत्काळ पीक विमा कंपनीस २ वर्षाची विमा रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे आदेश द्यावेत. तर अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी जाहीर केलेल्या अनुदानाची संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या उपोषणामध्ये जिल्हाध्यक्ष अमोल पवार, कार्याध्यक्ष प्रमोद पवार, तालुकाध्यक्ष अरविंद पाटील, रामलिंग मचाले, महादेव कदम, सुग्रीव काळे, संपत दुधे, दत्ता कदम, बबन वाघमारे, दीपक दुधे, आनंद दुधे, रंगनाथ कदम, आप्पासाहेब कदम, तातोबा पवार, प्रकाश पाटील, दादासाहेब कदम, बाबुराव कदम, शिवाजी कदम, हनुमंत कदम, कल्याण कदम, विकास तुळजापुरे, अविनाश मचाले, अमोल मचाले, अतुल गायकवाड, संजय काळे आदीसह शेतकरी सहभागी झाले आहेत.


 
Top