परंडा  / प्रतिनिधी-

 परंडा तालुक्यातील अनाळा येथे स्वयंम शिक्षण प्रयोग संस्था उस्मानाबाद व गोट ट्रस्ट लखनऊ यांच्या संयुक्त विद्यमाने पाच दिवशीय पशुसखी निवासी प्रशिक्षण घेण्यात आले.

येथील औसरे हॉल येथे   महिलांना शेळीपालनाविषयी मार्गदर्शन करण्यात आले. शेळ्यांना होणारे आजार, शेळीचे लसीकरण, पिल्लांच्या वजनवाढीसाठी करायचे नियोजन, उच्च प्रतीचे पशुखाद्य मिश्रण कसे तयार करायचे, विविध औषधी वनस्पतींपासून खोबरेल तेल मिश्रण करुन नीम ऑइल तयार करणे, मसाल्याच्या पदार्थांपासून मसाला तयार करणे आदींची प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. गोट ट्रस्टचे समन्वयक शिवाजी राऊत, प्रशिक्षक ज्ञानदेव शेंडे, अजय हराळे यांनी महिलांना कृतीद्वारे समजावून सांगितले.

हे प्रशिक्षण घेतल्याने शेळी पालकांच्या उत्पन्नात भरघोस वाढ होवून आर्थिक सक्षमता साधली जाणार आहे. प्रशिक्षणाच्या अंतिम दिवशी परंडा तालुक्यातील रत्नापूर येथील मिठू सावंत यांच्या बंदिस्त शेळीपालनास भेट देण्यात आली. गोट ट्रस्टचे शिवाजी राऊत, ज्ञानदेव शेंडे, अजय हराळे व प्रशिक्षणार्थी पशुसखींनी शेळ्यांना लसीकरण केले व तापमानाची तपासणी केली. या प्रशिक्षणामुळे गावातील शेळ्यांवर उपचार करण्यात मदत होणार आहे. स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेचे उपमन्यू पाटील, जिल्हा समन्वयक किरण माने, सहाय्यक समन्वियिका सीमा सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेण्यात आले. प्रशिक्षणाच्या यशस्वितेसाठी स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेच्या तालुका समन्वयिका नौशाद शेख यांनी परिश्रम घेतले.

 
Top