उस्मानाबाद / प्रतिनिधी-

धुळे व नंदुरबार जिल्हा बँकेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी विजय घोणसे पाटील यांना त्यांच्या कार्यकाळात झालेल्या बँकेच्या नुकसानीपोटी ८८ लाख ५४ हजार ९९२ रुपये एक महिन्याच्या आत भरणा करण्याचे आदेश चौकशी अधिकारी तथा विशेष लेखा परीक्षक विवेक पाटील यांनी दिले आहेत. घोणसे हे सद्य स्थितीत उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक असून ही रक्कम ते भरणार का? याकडेच नागरिकांचे लक्ष लागले आहे.

धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने प्रियदर्शनी सहकारी बँकेला कॉटन फोल्डर नावाचे कर्ज दिले होते. या कर्जाबाबत बँकेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्याघोणसे पाटील यांनी दंड व्याजाची अट टाकली नव्हती. त्यामुळे बँकेचे ८८ लाख ४ हजार १९२ रुपयाचे नुकसान झाले आहे. प्राधिकृत चौकशी अधिकारी तथा विशेष लेखा परीक्षक विवेक पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी केली. बँकेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी विजयघोणसे-पाटील यांच्यामुळेच बँकेचे नुकसान झाल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बँकेचे नुकसान ८८ लाख ४ हजार १९२ व चौकशी खर्च ५० हजार, असे एकूण ८८ लाख ५४ हजार १९२ रुपये एक महिन्याच्या आत बँकेत जमा करून पावती घ्यावी, असे आदेश चौकशी अधिकारी पाटील यांनी जारी केले आहेत. याबाबत घोणसे पाटील यांना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ८८ (१) व (२), नियम ७२ (६) व (७) अन्वये चौकशी अधिकारी पाटील यांनी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी घोणसे पाटील यांना नोटीस दिली आहे. चौकशी अधिकाऱ्यांच्या या कारवाईमुळे बँक अधिकाऱ्यात मोठी खळबळ उडाली आहे. 

 
Top