उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 तालुक्यातील सारोळा (बुद्रूक)-शिंदेवाडी व मसोबापाटी या रस्त्यावर सारोळा नजिक दीड कोटी रूपयांचा निधी खर्चून सबमर्शिबल पूल उभारण्यात येणार आहे. या कामास तांत्रिक मंजुरी मिळाली असून लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन काम सुरू होणार आहे. याठिकाणी पूल उभारणीची मागणी सारोळा ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार निवेदन देवून पाठपुरावा केला होता. त्यामुळे वर्षानुवर्ष पावसाळ्यात पुलाअभावी होणारी गैरसोय आता दूर होणार आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील सारोळा (बुद्रूक)-शिंदेवाडी ते मसोबा पाटी या रस्ता कामासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतंर्गत निधी मंजूर होवून सद्यस्थितीत काम वेगात सुरू आहे. मात्र या रस्त्यावर सारोळानजिक असलेल्या नदीवर पुलाची अत्यंत गरज आहे. ही बाब लक्षात घेवून ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांनी याठिकाणी सबमर्शिबल पुल उभारण्याची मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यालयाकडून याठिकाणी सबमर्शिबल पुलाचा प्रस्ताव तयार करून तो मंजुरीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावास मान्यता देवून कामासाठी १ कोटी ४९ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या पुल उभारणीच्या कामास नुकतीच तांत्रिक मान्यता मिळाली असून लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कामास सुरुवात होणार आहे. पावसाळ्यात पुलाअभावी शेतकऱ्यांसह ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागत होती. मात्र आता तांत्रिक मान्यता मिळाल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थांची वाट सुकर होणार आहे.


 
Top