उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शेताकडे ये-जा करण्यासाठी तसेच ढोकी व देवळाली या दोन गावांसाठी जवळचा ठरणार्‍या रस्त्याचे काम करण्यासाठी गावातील ग्रामस्थांनी पुढाकार घेत रस्त्याचे काम पूर्ण केले आहे. ढोकी ग्रामस्थांनी लोकसहभागातून पाच लाख रूपयांचा निधी उभारून तीन किलोमीटरपर्यंतचा रस्ता तयार केल्याचे दोन्ही गावातील शेतकर्‍यांची मोठी सोय झाली आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी ते देवळाली रस्त्याचे काम लोकसहभागातून पूर्ण झाले आहे. या कामासाठी शेतकरी व ढोकी ग्रामस्थांनी चार लाख 90 हजार रूपयांचा निधी उभारला. यातून ढोकी ते देवळाली हा पाणंद रस्ता तयार केला आहे. हा रस्ता डांबरीकरण नसला तरी मुरूम टाकून रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात आले आहे. ग्रामस्थांच्या या कामासाठी तहसीलदार गणेश माळी यांनीही मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी मंडळ अधिकारी व तलाठ्यांना सूचना देवून रस्त्याचे काम पूर्ण होण्यासाठी पुढाकार घेतला होता. निधी उभारणीसाठी ढोकी येथील शिवाजीराव देशमुख, सतीश देशमुख, शोएब काझी, अबरार काझी, विश्वजीत लंगडे, नंदू शेटे यांनी काम पाहिले. दोन्ही ग्रामस्थांना या रस्त्यासाठी तहसील प्रशासनाने सहकार्य व मार्गदर्शन केल्याने ग्रामस्थांनी तहसीलदार गणेश माळी यांचा प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार करून आभार व्यक्त केले. दरम्यान या तीन किलोमीटरच्या रस्त्यामुळे गावातील शेतकर्‍यांचा शेतरस्त्याचा प्रश्न मिटला आहे.


 
Top