उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 येथील कवयित्री भाग्यश्री केसकर लिखित ‘उन्हानं बांधलं सावलीचं घर’ या कवितासंग्रहाला राजगुरुनगर येथील नामांकित असा पद्मश्री नामदेव ढसाळ काव्यप्रतिभा पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या, राजगुरुनगर (जि.पुणे) शाखेच्यावतीने मागील सात वर्षांपासून हा पुरस्कार दिला जातो. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीचे औचित्य साधून रविवार, 27 फेब्रुवारी रोजी या पुरस्काराचे वितरण केले जाणार असल्याची माहिती मसापचे शाखाध्यक्ष संतोष गाढवे यांनी दिली.

येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात अधिपरीचारिका पदावर कार्यरत असलेल्या भाग्यश्री रवींद्र केसकर यांचा ‘उन्हानं बांधलं सावलीचं घर’ हा कवितासंग्रह जानेवारी 2020 मध्ये प्रकाशित झाला. मुंबई येथील ग्रंथाली प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेल्या या कवितासंग्रहाला यापूर्वी बडोदा येथील अखिल भारतीय पातळीवरील अभिरुची साहित्य गौरव पुरस्कारासह सहा राज्यस्तरीय मिळाले आहेत. पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या जयंतीचे औचित्य साधून 15 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र साहित्य परिषद राजगुरुनगर शाखेचे अध्यक्ष संतोष गाढवे यांनी पुरस्काराची घोषणा केली. राज्यातील अनेक मान्यताप्राप्त साहित्यिकांना मागील सात वषार्ंत या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. यावर्षीच्या पुरस्कारासाठी भाग्यश्री केसकर यांच्या ‘उन्हानं बांधलं सावलीचं घर’ कवितासंग्रहाची निवड करण्यात आली आहे. रोख रक्कम सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून रविवार, 27 फेब्रुवारी रोजी राजगुरुनगर येथील पंचायत समितीच्या सभागृहात पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला असल्याचे संयोजन समितीच्या वतीने कळविण्यात आले आहे.

भाग्यश्री केसकर यांच्या कवितासंग्रहाला यापूर्वी उमरगा येथील महात्मा ज्योतिबा फुले राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार, लातूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार, मंगळवेढा येथील शब्दकळा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार, कोपरगाव येथील भि. ग. रोहमारे ट्रस्टचा उल्लेखनीय ग्रंथ सन्मान मिळाला आहे. पद्मश्री नामदेव ढसाळ काव्यप्रतिभा पुरस्काराबद्दल भाग्यश्री केसकर यांचे अभिनंदन केले जात आहे.


 
Top