उस्मानाबाद / प्रतिनिधी-

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उस्मानाबाद शहरात मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती समितीसह शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने भरगच्च कार्यक्रमांचे अायोजन करण्यात आले आहे. व्याख्यान, शाहिरी,पोवाडे,गरजूंना मदत,महाशिवरॅली आदी कार्यक्रमांसह यावर्षीची शिवजयंती दणक्यात साजरी होत आहे. आज मंगळवारी (दि.१५) सायंकाळी  ६ वाजता माजी नगराध्यक्ष मकरंदराजे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवस्वराज्य ध्वजारोहण होईल. त्यानंतर शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने लेडीज क्लब मैदानावर प्रशांत देशमुख (रायगड) यांच्या व्याख्यानाने या सोहळ्याची सुरुवात होत आहे.

उस्मानाबादमध्ये दरवर्षी शिवजयंतीचा सोहळा उल्लेखनीय असतो.मात्र दोन वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमांवर निर्बंध आले होते. यावर्षीही शासनाने काही नियम घालून कार्यक्रमांना परवानगी दिली आहे. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत असल्याने शिवप्रेमींमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे यावर्षी शहरात दोन्ही समित्यांनी कार्यक्रमांची मेजवानी दिली आहे. शिवराज्याभिषेक सोहळा समितीने आयोजित केलेल्या कार्यक्रमांची मंगळवारी सुरुवात होत आहे. त्यानंतर बुधवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात वऱ्हाड निघालंय लंडनला हा एकपात्री प्रयोग, तसेच १७ तारखेला मंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचे व्याख्यान होईल व  संभाजी िब्रगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांचे व्याख्यान, गुरूवारी सायंकाळी शाहीर रंगराव पाटील (कोल्हापूर) यांचा पोवाडा नाट्य हा कार्यक्रम होणार आहे. १५ ते १७ फेब्रुवारीदरम्यान दररोज सायंकाळी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या व कोरेानात मृत पावलेल्यांच्या वारसांना १०० शिलाई मशिनचे वाटप करण्यात येणार आहे. उपरोक्त कार्यक्रम लेडीज क्लब मैदानावर होतील. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून शिवरॅली निघणार आहे.या रॅलीचे नेतृत्व अक्कलकोट येथील मालोजी राजे भोसले,शिवरायांच्या सरदारांचे वंशज श्रीमंत करणसिंह नाईक बांदल, सुभेदार कुणाल मालुसरे, सरदार अनिकेतराव कोंडे-देशमुख हे करणार आहेत.ध्वजांमुळे शहर भगवेमय झाले आहे. दुचाकी, ऑटोरिक्षा, चारचाकी वाहनांवर ध्वज लागले आहेत. शिवप्रेमींमध्ये शिवजयंतीचा उत्साह दिसून येत आहे.

 
Top