उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जन्मल्यानंतर तिसर्‍या महिन्यातच थॅलेसेमियाचा आजार जडलेल्या चिमुरडीला जगविण्यासाठी मोलमजुरी करणार्‍या पालकांनी मोठे प्रयत्न केले. पण तिच्या उपचाराचा खर्च पेलवण्यापलीकडे गेल्यामुळे अखेर अंजुमन वेल्फेअर सोसायटीने या चिमुकलीच्या उपचारासाठी मदतीचा हात पुढे केला आणि थॅलेसेमियाग्रस्त चिमुकलीच्या चेहर्‍यावर पुन्हा ‘मुस्कान’ फुलली आहे. तिच्यावर उपचासाठी तब्बल दोन लाख रुपयांची मदत अंजुमन सोसायटीमार्फत करण्यात आली आहे.

उस्मानाबाद शहरातील गालिबनगर येथील जावेद शेख हे मोलमजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. त्यांची मुस्कान ही 11 वर्षाची मुलगी थॅलेसेमिया आजाराने ग्रस्त आहे. जन्मल्यानंतर तिसर्‍या महिन्यापासून या आजाराशी ती झुंज देत आहे. थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना जगण्यासाठी नियमितपणे रक्त देण्याची गरज असते. दर चार ते सहा आठवड्यांनी त्यांना रक्त द्यावे लागते. अशाप्रकारे नियमित रक्त न मिळाल्यास हे रुग्ण जगत नाहीत. त्यामुळे शेख कुटुंबीयांकडून मुस्कानला वाचविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात होते. परंतु आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने उपचाराचा मोठा खर्च पेलवणारा नव्हता. त्यातच आठ दिवसांपूर्वी मुस्कान हिची प्रकृती अचानक खालावली. पालकांनी तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु तिथे उपचाराची व्यवस्था नसल्याने सोलापूरला जाण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला. त्यामुळे हतबल झालेले जावेद शेख यांनी अंजुमन वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष फेरोज पल्ला यांच्याशी संपर्क साधून परिस्थिती सांगितली.

त्यानंतर फेरोज पल्ला यांनी तातडीने जावेद शेख यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. दरम्यान सोसायटीला नेहमीच सहकार्य करणार्‍या सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अ‍ॅन्ड पोस्ट गॅ्रज्युएट इन्स्टिट्युटशी संपर्क साधून मुस्कान हिच्या आजाराविषयी माहिती देऊन उपचारासाठी विनंती केली. तेथील डॉक्टरांनी मुस्कान हिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास सांगितले. सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये तिच्या शरीरात रक्तपेशी आणि इतर औषधोपचार केल्यानंतर तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली. त्यानंतर पुढील उपचारासाठी तिला मुंबई येथील केईएम हॉस्पिटलमध्ये पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. शेख कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असल्याने अंजुमन वेल्फेअर सोसायटीने सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्समधील संपूर्ण उपचारासाठी पन्नास हजार रुपयांची मदत केली. उपचारासाठी मोठा खर्च झालेला असताना हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने बिलामध्ये मोठी सवलत देऊन सहकार्य केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी दीड लाख रुपये जावेद शेख यांच्याकडे  सोसायटीच्या वतीने सुपुर्द करण्यात आले. एकुण दोन लाख रुपयांची मदत अंजुमन सोसायटीमार्फत करुन थॅलेसेमियाग्रस्त चिमुकलीच्या पुन्हा मुस्कान फुलवली आहे. या मदतीबद्दल अंजुमन वेल्फेअर सोसायटीचे शेख कुटुंबीयांनी आभार व्यक्त केले. यावेळी मुस्कान हिला सोसायटीचे अध्यक्ष फेरोज पल्ला यांनी चॉकलेट आणि फूल देऊन निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी कुलस्वामिनी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. रमेश दापके-देशमुख, सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्सचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ.प्रकाश शेलार, डॉ.सचिन गायकवाड, अंजुमन वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष फेरोज पल्ला, सोसायटीचे सदस्य तथा प्रेरणादायी वक्ते अर्शद सय्यद, वसीम रज्जाक, सरफराज पटेल, सुलतान मशायक, रिजवान शेख, ए.जे. सोशल फाऊंडेशनचे अनिरुद्ध जोशी तसेच हॉस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होते.


 
Top