उस्मानाबाद / प्रतिनिधी-

येथील मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सव समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची (२०२२) घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघातील क्रिकेटपटू राजवर्धन हंगरगेकर यांच्या मातोश्री अनिता हंगरगेकर यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार तर सुमारे ३० किलोमिटर समुद्री जलतरण स्पर्धेत पोहून दुसरा क्रमांक पटकावणाऱ्या श्रावणी रणखांब या कन्येला क्रीडा भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त देण्यात येणारे हे पुरस्कार लवकरच मान्यवरांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेत.

जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त येथील मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सव समितीच्या वतीने दरवर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही कोरेाना नियमांचे पालन करून भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिजाऊ जन्मोत्सव समितीच्या अध्यक्षा डॉ.वृंदाराणी विधाते (वीर), कार्याध्यक्ष अमोल सिरसट यांच्या प्रमुख उपस्थितीत समिती पदाधिकारी, सदस्यांची बैठक यशश्री क्लासेसच्या सभागृहात नुकतीच पार पडली. यावेळी कार्यक्रमाविषयी चर्चा करण्यात आली तर समितीच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. राजवर्धन हंगरगेकर याने प्रतिकुल परिस्थितीत क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले असून, त्याची १९ वर्षाखालील वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघात निवड झाली होती.त्याच्या मातोश्री अनिता हंगरगेकर यांनी त्याच्यासाठी मोठी मेहनत घेतली होती.त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना जिजाऊ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.तसेच उस्मानाबादेत स्विमिंग टँक नसतानाही तळ्यात सराव करत ३० किलोमिटर समुद्री जलतरण स्पर्धेत यश मिळविलेल्या श्रावणी रणखांब हिला स्वराज्य संकल्पक शहाजीराजे क्रीडा भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. यावर्षी सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या चाईल्ड लाइन संस्थेच्या संचालिका डॉ.वसुधा दापके यांना राजर्षी शाहू समाजभूषण, शिक्षण क्षेत्रातला पुरस्कार कर्मवीर मामासाहेब जगदाळे शिक्षकरत्न पुरस्कार सुवर्णा शिनगारे यांना तर विशेष सेवा कार्य पुरस्कार डॉ.विशाल वडगावकर यांना जाहीर करण्यात आला आहे.युवा उद्योजक पुरस्कार प्रवीण माळी व अजित भोरे यांना देण्यात येणार आहे.

जिजाऊ जयंतीिदनी रक्तदान शिबीर

जिजाऊ जन्मोत्सव समितीच्या वतीने बुधवार, दि.१२ जानेवारी रोजी जिजाऊ चौकात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊंच्या पुतळ्याचे पूजन होईल. त्यानंतर रक्तदान शिबीराचे उद्घाटन होईल. यादरम्यान संजीवणी विष्णू इंगळे यांचे लाठ्याकाठ्यांचे प्रात्यक्षिक होईल. १२ जानेवारीला बाळांना जन्म देणाऱ्या मातांचा साडीचोळी, मिठाई वाटप करून सत्कार करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम गुरूवार, १३ जानेवारी रोजी जिल्हा महिला रूग्णालयात सकाळी १० वाजता होणार आहे.


 
Top