उस्मानाबाद / प्रतिनिधी-

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी सोमवारी आदेश काढले आहेत. यात जिल्हयातील शाळा, महाविद्यालय १५ फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्याचे स्पष्ट केले. तसेच शासकीय, खासगी कार्यालयातही निर्बंध लावले आहेत. ११ जानेवारीपासून हे नियम पुढील आदेशापर्यंत लागू असणार आहे.

राज्यात राज्य शासनाने ८ आणि ९ जानेवारी २०२२ रोजी निर्बंध जारी केले आहेत. त्याच अनुषंगाने जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी सोमवारी आदेश जारी करून जिल्हयातही निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार जिल्हयात सकाळी पाच ते रात्री ११ वाजेपर्यंत पाच पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास किंवा जमा होण्याचे मनाई आदेश लागू केले. यावेळेत अत्यावश्यक कारणांशिवाय बाहेर फिरण्यासही मनाई केली. विवाह कार्यक्रमास केवळ ५० तर अंत्यविधीसाठी केवळ २० लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी दिली. सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रम आणि मेळाव्यास ५० लोकांची मर्यादा लागू केली. कोचिंग क्लासेस येत्या १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत बंद असतील.

असे असतील इतर निर्बंध

शासकीय कार्यालयात कोणत्याही नागरिकांना संबंधित कार्यालय प्रमुखांचे लेखी परवानगी शिवाय कार्यायालयात प्रवेशास मनाई असेल. कार्यालय प्रमुखांनी नागरिकांशी व्हीसी द्वारे ऑनलाइन संवादाची व्यवस्था कार्यान्वित करावी. शासकीय बँकांकरिता एकाच कार्यालय परिसराच्या अथवा मुख्यालयाच्या बाहेरील उपस्थितांकरिता ऑनलाइन व्ही.सी. सुविधेचा वापर करण्यात यावा. शक्य असल्यास कर्मचाऱ्यांना घरुनच काम (वर्क फ्रॉम होम) करण्यास प्रोत्साहन द्यावे. कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासांबाबत लवचिकता ठेवण्यास मुभा राहील. सर्व कार्यालयाचे प्रवेशद्वाराजवळ थर्मल स्कॅनर्स, सॅनिटायझर मशिन उपलब्ध ठेवण्यात यावे.

खासगी कार्यालय व्यवस्थापनाने घरुन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या आणि कामाच्या तासांमधील पुरेसे अंतर याबाबत सुयोग्य सुसूत्रीकरण करावे. कार्यालयामध्ये नियमित उपस्थितांची मर्यादा ५० टक्के पेक्षा जास्त नसावी. कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासांमध्ये लवचिकता ठेवणे, कार्यालये २४ तास आणि वेगवेगळ्या सत्रांमध्ये (शिफ्ट्स) चालू ठेवावे. महिला कर्मचाऱ्यांची सुरक्षितता आणि सोय या बाबी प्राधान्याने विचारात घ्याव्यात. कामकाजाच्या वेळा व कामाचे विषम तास निश्चित करावे. तसे ओळखपत्र असल्यास कार्यालयीन कामकाजाकरिता करण्यात येणारा प्रवास हा अत्यावश्यक समजला जाईल. लसीकरणांचे दोन्ही डोस घेतलेल्या कर्मचाऱ्यांना केवळ कार्यालयात प्रत्यक्ष प्रवेशाची मुभा राहील. सर्व कार्यालयाचे प्रवेशद्वाराजवळ थर्मल स्कॅनर्स, सॅनिटायझर मशिन उपलब्ध ठेवण्यात यावे.

क्रीडा स्पर्धा- राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पूर्वनियोजित स्पर्धांना अटी व शर्तींनुसार परवानगी असेल. प्रेक्षकांना परवानगी नसेल. सर्व खेळाडू/स्टाफ करिता बायो-बबल असेल. सहभागी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत खेळाडूंना-आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रत्येक तीन दिवसाने आरटीपीसीआर/रॅट चाचणी करणे बंधनकारक असेल. गाव,शहर,तालुका,जिल्हा स्तरावरील कोणत्याही स्वरुपाचे क्रीडा स्पर्धांना पूर्णत: मनाई असेल.

 
Top